लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण १४ वर्षांनंतर बहरले, नवऱ्याला माहिती झाल्यानंतर पोलिसांत पोहचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 16:32 IST2021-12-02T15:20:32+5:302021-12-02T16:32:20+5:30
त्या दोघांचे १४ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. जात आडवी आल्याने त्यांच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यानंतर आधी तिचे आणि नंतर त्याचे लग्न झाले. त्यानंतर, दीड वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीत ते पुन्हा संपर्कात आले आणि जुने प्रेम पुन्हा नव्याने उफाळून आले.

लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण १४ वर्षांनंतर बहरले, नवऱ्याला माहिती झाल्यानंतर पोलिसांत पोहचले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जात आडवी आल्याने अर्ध्यावर थांबलेली प्रेमकहाणी लग्नाच्या १४ वर्षांनंतर बहरली. विवाहित असूनदेखील त्यांनी लग्नापूर्वीच्या प्रेमकथेला नव्याने सुरुवात केली. साऱ्या मर्यादाही ओलांडल्या. मात्र, एक दिवस महिलेच्या पतीला ते माहीत झाले अन् नंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. आता प्रियकर बलात्काराच्या आरोपात पोलिसांच्या कोठडीत पोहोचला आहे.
मनीष सजन तांबेकर (वय ३८) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो उमरेडमध्ये पान टपरी चालवतो. तक्रार करणारी महिला (वय ३५) आणि मनीषमध्ये १४ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. जात आडवी आल्याने त्यांच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यानंतर आधी तिचे आणि नंतर मनीषचे लग्न झाले. दोघांनाही तीन-तीन अपत्ये आहेत. दीड वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीत ते पुन्हा संपर्कात आले. त्यानंतर जुने प्रेम नव्याने उफाळून आले. कधी उमरेड, तर कधी नागपूरदरम्यान या दोघांची प्रेमकथा बहरू लागली. त्यांच्यात नियमित शरीरसंबंधही प्रस्थापित होऊ लागले.
त्यानंतर मे २०२० पासून तो तिच्यावर नको तेवढा अधिकार दाखवू लागला. वारंवार भेटीगाठी होऊ लागल्याने महिलेच्या पतीला त्यांच्या प्रेमकथेची माहिती झाली. त्याने तिची खरडपट्टी काढल्याने तिने मनीषला टाळणे सुरू केले. परिणामी मनीष तिला त्यांच्या संबंधाचे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करू लागला. तिचा वेळोवेळी पाठलाग करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करू लागला. तिची कोंडी झाल्याने तिने नवऱ्याला हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहोचले. वरिष्ठ निरीक्षक वैभव जाधव आणि द्वितीय निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना महिलेने आपली व्यथा वजा तक्रार सांगितली. प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
आरोपी गजाआड
जरीपटका पोलिसांनी बुधवारी रात्री उमरेडला जाऊन त्याला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी त्याच्याकडून त्याचा मोबाईलही जप्त केला असून, त्यात त्याने महिलेसोबतच्या एकांतक्षणाचे व्हिडीओ दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे.