प्रेमप्रकरणातून वाद : नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:39 IST2018-10-20T00:38:44+5:302018-10-20T00:39:27+5:30
प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाल्याने एका गटातील आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात मनोज गणेश कनोजिया (वय २४) नामक तरुण गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्रेमप्रकरणातून वाद : नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाल्याने एका गटातील आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात मनोज गणेश कनोजिया (वय २४) नामक तरुण गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर, मनोजने एका तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सदर तरुणीने दिल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजतादरम्यान हा प्रकार माहेश्वरी भवनाजवळ घडला.
सीताबर्डी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचे गेल्या चार वर्षांपासून एका तरुणी (वय २१)सोबत ओळख होती. गुरुवारी सकाळी १० वाजता ती गवळीपुरा येथे गरब्याच्या कार्यक्रमातून परत येत असताना मनोजने तिचा पाठलाग केला. हा प्रकार तरुणीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी मनोजला दुपारी २ वाजता माहेश्वरी भवनजवळ गाठले. तेथे त्याच्याशी वाद घातला. त्याच्या मोबाईलवर उपरोक्त तरुणीचा फोटो डीपीच्या स्वरूपात पाहून आरोपी जितू जगदीश यादव (वय २२), मयूर राजकुमार अहिर (वय २८), निहाल शैलेंद्र जोशी (वय २३) आणि नेहाल ऊर्फ सोनू प्रकाश जरगर (वय २३, रा. गवळीपुरा, टेकडी लाईन) या चौघांनी त्याला दगड आणि काठीने मारून जबर जखमी केले. आजूबाजूची मंडळी धावल्याने मनोज बचावला. उपचारानंतर त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी जितू, मयूर, निहाल आणि जरगर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे तरुणीच्या तक्रारीवरून मनोजविरुद्धही पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.