सूर ज्योत्स्ना पुरस्कार भारतीय संगीताचे अस्सल प्रतिबिंब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:18 IST2026-03-24T11:17:51+5:302026-03-24T11:18:36+5:30
पं. अजय पोहनकर, अनू मलिक, शान, शरयू दाते, ऋषिकेश करमरकर, निशांत गुप्ता यांचा गौरव

सूर ज्योत्स्ना पुरस्कार भारतीय संगीताचे अस्सल प्रतिबिंब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ज्योत्स्ना दर्डा या सुरांच्या उपासक होत्या. त्यांनी सुरांची अक्षरश: सेवा केली होती व त्यांच्या स्मृतीत देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांना मी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतो. हा पुरस्कार म्हणजे समाजातील संगीत प्रतिभांना समोर आणणारा सशक्त मंच आहे. खऱ्या अर्थाने सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार म्हणजे भारतीय संगीताचे प्रतिबिंब असून कलावंतांना सन्मानित करण्याची संधी मिळते. या पुरस्काराच्या माध्यमातून भारतीय संगीताच्या प्रतिबिंबाचा अनुभव घेता येतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा ‘१३ वा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा रविवारी मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात रंगला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध सिनेगायक शान (शांतनु मुखर्जी) यांच्या ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’मध्ये अक्षरश: स्वरांची बरसात झाली.
या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वारकरी परंपरेतील अभिजात संगीत आणि शास्त्रीय गायनातील हुकूमत गाजवणारे युवा कलाकार शरयू दाते व हृषिकेश करमरकर यांना ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ने गौरवान्वित करण्यात आले. यासोबतच पं. अजय पोहनकर यांना लेजंड, सुप्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांना विशेष पुरस्कार, प्रसिद्ध सिनेगायक शान यांना आयकॉन तर बालप्रतिभा पुरस्काराने निशांत गुप्ता यास सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सन्मानीय अतिथी म्हणून तर सुप्रसिद्ध पार्श्वगायक व संगीतकार रूपकुमार राठोड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमत एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन तथा माजी खासदार डॉ. विजय दर्डा हे होते. यासोबतच मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, खा. अमर काळे, खा. श्यामकुमार बर्वे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी, आ. संजय मेश्राम, आ. चरणसिंग ठाकूर, आ. कृपाल तुमाने, आ. आशिष देशमुख, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, हेडक्वार्टर उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सबएरियाचे जीओसी मेजर जनरल नवतेजसिंह सोहल उपस्थित होते. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. आभार लोकमत नागपूरचे युनिट हेड आशिष जैन यांनी मानले.