यवतमाळातील 'त्या' हत्याकांडातील आठही आरोपींची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:35 IST2025-10-25T15:34:57+5:302025-10-25T15:35:53+5:30
Yavatmal : सत्र न्यायालयाने आरोपींना हत्येच्या कटाकरिता जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

Life imprisonment of all eight accused in 'that' Yavatmal murder case upheld; High Court decision
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील अनिल थूल हत्याकांडामधील आठही आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
आरोपींमध्ये रोहित विजय ओंकार, आदेश ऊर्फ आद्या अनिल खैरकर, सुहास अनिल खैरकर, अश्विन ऊर्फ गोंड्या दीपक तेलंग, रोशन ऊर्फ कांडी पुरुषोत्तम प्रधान, अनुप ऊर्फ दादू अनिल रामटेके, सचिन ऊर्फ बंट्या अशोक भोयर व वैभव कृष्णा नाईक यांचा समावेश आहे. यातील वैभव नाईकचा मृत्यू झाला आहे.
३१ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ९ च्या सुमारास अनिल थूल व त्याचा मित्र प्रेमराज शेंडे एका दुकानापुढे गप्पा करीत होते. दरम्यान, आरोपी घातक शस्त्रांसह तेथे गेले व त्यांनी थूल आणि शेंडेवर हल्ला केला. त्यांनी थूल याला जाग्यावरच ठार मारले तर, शेंडे थोडक्यात बचावला.
१२ एप्रिल २०१९ रोजी सत्र न्यायालयाने या आरोपींना हत्येच्या गुन्ह्याकरिता जन्मठेप व दहा हजार रुपये दंड या कमाल शिक्षेसह हत्येचा प्रयत्न व इतर काही गुन्ह्यांमध्ये विविध कालावधी व दंडाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने हत्येचा कट वगळता इतर सर्व गुन्ह्यांमधील शिक्षा कायम ठेवून आरोपींना दणका दिला.
हत्येच्या कटाची शिक्षा रद्द
- सत्र न्यायालयाने आरोपींना हत्येच्या कटाकरिता जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
- उच्च न्यायालयात हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे आरोपींना या गुन्ह्यात निर्दोष ठरवून ही शिक्षा रद्द करण्यात आली.