Leopard Killed in Vehicle dashed: Incident in Harnakund Shivnar | वाहनाच्या धडकेत बिबट ठार : हरणाकुंड शिवारातील घटना

वाहनाच्या धडकेत बिबट ठार : हरणाकुंड शिवारातील घटना

ठळक मुद्देनागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (देवलापार) : भरधाव अज्ञात वाहनाने नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मादी बिबट्याला जोरात धडक दिली. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना या देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरणाकुंड शिवारात शुक्रवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली.
या मादी बिबटचे वय ३ ते ४ वर्षे असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. हरणाकुंड शिवार हा पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी एकसंघ नियंत्रण रेंजच्या बोथिया पालोरा बीट अंतर्गत येत असून, घटनास्थळ हे या बीटमधील उपशामक पूल क्रमांक - ६ जवळ तसेच कक्ष क्रमांक - ५८२ मध्ये आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली असावी, अशी शक्यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असून, काहींनी ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असल्याचे सांगितले.
रोड ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिला गंभीर दुखापत झाली. बचार वेळ उपचाराविना पडून राहिल्याने तिथेच तिचा मृत्यू झाला. माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी पोहोचले. तोपर्यंत ती गतप्राण झाली होती. तिला कारने धडक दिली असून, ती कार मध्य प्रदेश पासिंग असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुपारच्या सुमारास पेंच क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिलाल, डॉ. चेतन यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वन विभागीची टीम मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या नाक्यांवर चौकशी करीत आहेत.

तीन वाघांचा अपघाती मृत्यू
या महामार्गाच्या दोन्ही बाजूला जंगल असून, त्या जंगलाल विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. मार्ग ओलांडताना वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असल्याने हा मार्ग त्यांच्यासाठी कर्दनकाळ बनला आहे. आजवर अपघातात या जंगलातील तीन वाघांना प्राण गमवावे लागले. सन २०१७ मध्ये याच मार्गावरील मानेगावटेक शिवारात वाघाचा मृत्यू झाला होता. १ फेब्रुवारी २०१८ रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाने वन अधिकाºयांवर हल्ला चढविला होता. चिंदाई माता मंदिराजवळ बिबट्याचा मृत्यू झाला होता तर देवलापार नजीक वाघ गंभीर जखमी झाला होता. अपघातात जखमी होणाºया इतर वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे.

अंडरपासची कमतरता
या मार्गावर वन्यप्राण्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या अंडरपासची मोठी कमतरता आहे. अंडरपास नसल्याने वन्यप्राण्यांना रोड ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते. या मार्गालगतचे चोरबाहुली ते मानेगावटेक पर्यंतचे क्षेत्र वन्यजीव अंतर्गत येते. या भागात पुरेसे अंडरपास तयार करणे आवश्यक असताना चोरबाहुली ते पवनी, भुरालटेक व मोरफाटा ते मानेगाव या भागात वेकळ तील अंडरपास तयार केले आहे. वास्तवार या भागात नऊ अंडरपासची गरज आहे. अनेक ठिकाणी नाल्यातून जाणाऱ्या मार्गाला कागदोपत्री अंडरपास दाखविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Leopard Killed in Vehicle dashed: Incident in Harnakund Shivnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.