विधीमंडळ प्रवेशाच्या पासेसची दीड हजारांत विक्री, परिषदेतील आमदाराचा खळबळजनक दावा
By योगेश पांडे | Updated: December 12, 2025 14:46 IST2025-12-12T14:44:15+5:302025-12-12T14:46:25+5:30
Nagpur : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानपरिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)सदस्य हेमंत पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

Legislative Assembly entry passes sold for Rs 1.500, sensational claim by MLA in council
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानपरिषदेतील शिवसेना सदस्य हेमंत पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. विधीमंडळात परिसरात प्रवेशासाठीच्या अभ्यागतांच्या पासेसची दीड हजारांत विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे विधीमंडळ वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानपरिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. आमचे काही कार्यकर्ते दिवसभर बाहेर उभे होते. मात्र आमचे पत्र असूनदेखील त्यांना पासेस मिळाल्या नाहीत. परंतु बाहेर दीड हजारांत प्रवेशासाठी पासेस विकण्यात येत आहेत. अशा पद्धतीने तर विधीमंडळाची सुरक्षाच धोक्यात आली असून ही लाजीरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने तर कधीही दहशतवादी आत शिरू शकतात. अशा पद्धतीने कुणी पासेस जारी केले व त्या बदल्यात पैसे घेतले याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली. यावर अमोल मिटकरी यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला. यंदा परिसरात गर्दी टाळण्यासाठी मर्यादित पासेस वाटण्यात येणार असल्याचे अधिवशनाच्या दुसऱ्या दिवशी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत परिसरात इतकी गर्दी आहे की नीट चालणेदेखील कठीण झाले आहे. इतके सारे लोक आत कसे काय येत आहेत व इतक्या प्रमाणात पासेस का जारी करण्यात येत आहेत, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला. यावर तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिले.