तीनही पक्षांचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फार्म्युला ठरवतील - देवेंद्र फडणवीस
By कमलेश वानखेडे | Updated: May 27, 2024 19:55 IST2024-05-27T19:55:32+5:302024-05-27T19:55:35+5:30
भाजपला जास्त जागा पण दोन मित्रपक्षांचा सन्मान राखणार

तीनही पक्षांचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फार्म्युला ठरवतील - देवेंद्र फडणवीस
नागपूर: लोकसभेच्या निकालानंतर महायुतीतील तीनही पक्षाचे नेते एकत्र बसतील. योग्य फार्म्युला ठरवतील. त्यानुसार तीनही पक्षांच्या जागा ठरतील. निश्चित भाजप मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळतील. आमच्या सोबत जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणातील आरोपीचे रक्ताचे नमुने बदलविण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस कारवाई करीत असल्याचे सांगितले. संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखाबद्दल विचारणा केली असता, संजय राऊत यांच्याबाबत मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत. तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ते योग्य उपचार घेतील, असा टोला त्यांनी लगावला.
मोदी हेच पुन्हा पंतप्रधान
सहाव्या टप्प्यानंतरच एनडीएने बहुमत पार केले आहे. यावेळी भाजपला अभूतपूर्व यश मिळणार आहे. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.