स्पेशालिस्ट डॉक्टरांची देशात मोठी कमतरता; लाखामागे केवळ ८.८ जनरल सर्जन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:01 AM2020-11-04T11:01:19+5:302020-11-04T11:02:08+5:30

Health Nagpur News नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात जनरल सर्जन्सची मोठी कमतरता आहे.

A large shortage of specialist doctors; Only 8.8 General Surgeons per lakh |  स्पेशालिस्ट डॉक्टरांची देशात मोठी कमतरता; लाखामागे केवळ ८.८ जनरल सर्जन्स

 स्पेशालिस्ट डॉक्टरांची देशात मोठी कमतरता; लाखामागे केवळ ८.८ जनरल सर्जन्स

Next
ठळक मुद्देआवश्यक सर्जन्सची संख्या गाठण्यास लागणार ४३ वर्षे

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. परंतु आवश्यक व्यवस्थाच नसल्याने स्पेशालिटी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात जनरल सर्जन्सची मोठी कमतरता आहे. एक लाखामागे २२ सर्जन्सची गरज असताना केवळ ८.८ सर्जन्स आहेत. विशेष म्हणजे, ही संख्या गाठायला तब्बल ४३ वर्षे लागतील. अशीच स्थिती इतर स्पेशालिटी विषयातील डॉक्टरांची आहे.

भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वैद्यकीय महाविद्यालयांची कमतरता, सोयींचा अभाव व कमी जागांमुळे लोकसंख्येचा निकषानुसार तज्ज्ञ डॉक्टर निर्माण होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, याचा प्रभाव आरोग्य सेवेवर पडत आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात दरवर्षी ‘एमडी/‘एमसीएच’मधून ३,४९८ तर ‘डीएनबी’/एफएनबी’मधून ३९८ असे एकूण ३,८९६ जनरल सर्जन्स तयार होतात. मात्र देशाला दरवर्षी १,६७,१०४ सर्जन्सची गरज आहे.

 लाखामागे सात बधिरीकरण तज्ज्ञांची आवश्यक्ता

देशात दरवर्षी ४,७०७ बधिरीकरण तज्ज्ञ निर्माण होतात. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत ८७,९४० तज्ज्ञांची उणीव पडत आहे. परिणामी, एक लाखामागे सात तज्ज्ञ आवश्यक असताना ३.४ तज्ज्ञ उपलब्ध होत आहेत. उणीव भरून निघण्यास १८ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

७१,१९१ प्रसूती तज्ज्ञांची उणीव

लाखामागे १० प्रसूती तज्ज्ञांची गरज असताना देशात ४.२ तज्ज्ञ आहेत. यामुळे गावखेड्यातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी शहरात किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. लोकसंख्येच्या तुलनेत ७१,१९१ तज्ज्ञांची गरज आहे. ती पूर्ण होण्यास १९ वर्षे लागण्याची शक्यता आहे.

 लाखामागे केवळ ०.४४ मानसोपचार तज्ज्ञ

दरवर्षी १९,२८५ मानसोपचार तज्ज्ञांची गरज असताना १०१५ तज्ज्ञ निर्माण होतात. लाखामागे दोन तज्ज्ञांची आवश्यक्ता असताना केवळ ०.४४ मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही गरज पूर्ण होण्यास १९ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

 बालरोग तज्ज्ञांची गरज पूर्ण होण्यास ३८ वर्षे

१९ वर्षाखालील बालकांच्या एक लाखामागे ३२ बालरोग तज्ज्ञांची गरज असताना केवळ ११.२ तज्ज्ञ आहेत. दरवर्षी या विषयातील ३,४५८ तज्ज्ञ निर्माण होतात. १,१७,१०२ तज्ज्ञांची उणीव भरून काढण्यास ३८ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: A large shortage of specialist doctors; Only 8.8 General Surgeons per lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.