पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
By नरेश डोंगरे | Updated: December 11, 2025 14:58 IST2025-12-11T14:51:46+5:302025-12-11T14:58:21+5:30
Nagpur : पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर चौदाशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप करून शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळ उडून दिली.

Land acquisition scam worth Rs 1400 crore on Pandharpur Mohol Palkhi Marg! Sushma Andhare's allegations against BJP- Shinde Sena leaders create a stir
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर चौदाशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप करून शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळ उडून दिली. भाजपाचे सोलापूर जिल्ह्यातील नेते रमेश माने आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरण चौरे यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवघ्या दोन किलोमीटर क्षेत्रातील जमिनीतून भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोपही अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे पत्रकारांना दाखवतानाच त्यांनी जे शेतकरी खऱ्या अर्थाने पीडित आहे आणि ज्यांची या प्रकल्पात जमीन गेली अशापैकी एक मारुती सुखदेव माने या शेतकऱ्याला मात्र जमीन जाऊनही मोबदला दिला गेला नाही, असे सांगून त्यांनी पीडित शेतकरी माने यांना पत्रकार परिषदेत उपस्थित केले.
अंधारे यांच्या आरोपानुसार, पंढरपूर मोहोळ हा ५९ किलोमीटरचा पालखी मार्ग तयार करण्याचे ठरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या बदल्यात मोबदला देण्याची कागदोपत्री प्रक्रिया महसूल विभागाने करायची होती आणि त्या आधारे केंद्रातून निधी उपलब्ध झाल्यानंतर तो निधी शेतकऱ्यांना वितरित करण्याची जबाबदारीही महसूल विभागाची होती.
त्यानुसार, पंढरपूर मोहोळ दरम्यान पन्नूर या छोट्याशा खेडेगावातील शेतकऱ्यांच्या जमिनीही या प्रकल्पात गेल्या. त्याचा मोबदला वितरित करताना बीजेपीचे त्या भागातील प्रभावी नेते रमेश माने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख चरण चौरे तसेच अन्य काही जणांनी अधिकाऱ्याशी संगणमत करून कोट्यवधीचा निधी लाटला. १९ अधिकारी आणि सुमारे ७० लाभार्थ्यांनी ११० कोटी रुपयांचा घोटाळा केला.
विशेष म्हणजे, माने आणि चौरे या दोघांनी प्रकल्पात गेलेल्या जमिनीवर वारंवार वेगवेगळे कारण सांगून नऊ कोटी ३८ लाख रुपये उचलल्याचा आमच्याकडे पुरावा असल्याचेही अंधारे म्हणाल्या. दुसरीकडे जमीन प्रकल्पात जाऊनही आपल्याला मोबदला का मिळत नाही या संबंधाने पीडित शेतकरी मारुती सुखदेव माने यांनी संबंधित अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांकडे पत्र व्यवहार केला आणि शेवटी वैतागून त्यांनी माहितीच्या अधिकारात या भूसंपादन आणि मोबदल्याची माहिती मागितली असता उपलब्ध झालेल्या कागदपत्रातून हा घोटाळा पुढे आला, असे त्यांनी सांगितले.
केवळ दोन किलोमीटरच्या जमीन क्षेत्रात ११० कोटीचा घोटाळा होतो त्याचा अर्थ संपूर्ण ५९ किलोमीटर क्षेत्रातील घोटाळ्याची रक्कम १४०० कोटींपेक्षा जास्त होऊ शकते, असेही अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपये उचलणाऱ्या रमेश माने आणि चरण चौरे या दोघांचे त्यांच्या पक्षातील शीर्षस्थ नेत्यासोबतचे फोटो पण पत्रकारांना दाखवले.
पाईपलाईन गेलीच नाही पैसे मात्र गेले
या संबंधाने माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्राचा हवाला देत अंधारे यांनी सांगितले की माने चौरे आणि अन्य काही लोकांनी प्रकल्पात गेलेल्या जमिनीतून पाईपलाईन गेल्याचे पैसे उचलण्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पात संबंधित दोन किलोमीटरच्या क्षेत्रातून पाईपलाईनच गेली नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारातून दिली आहे.
मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांनी सभागृहात माहिती द्यावी
शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज या संबंधाने विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे अन्य नेते ही दोन्ही सभागृहात चौदाशे कोटींच्या या भूसंपादन घोटाळ्यावर सरकारची भूमिका काय आहे, त्याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संबंधाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली. या घोटाळ्यात संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन उभे करू, असेही अंधारे म्हणाल्या.
पीडित शेतकरी म्हणतो जीवाला धोका माहितीच्या अधिकारातून हा घोटाळा पुढे आणणारे पीडित शेतकरी मारुती सुखदेव माने यांनी पत्रकारांशी बोलताना आमच्या भागात वाल्मीक कराड सारखे गुंड आहेत, ते आपल्या जीवाला धोका करू शकतात, अशी भीती व्यक्त केली. आपण हा घोटाळा उघडकीस आणला त्यामुळे सर्व बील व्यवस्थित भरले असताना आपल्या घराचा वीज पुरवठा खंडित करणे धमक्या देणे, असेही प्रकार सुरू असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणीही मारुती माने यांनी केली.