नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी जपली संवेदना : गंगा-जमुनातील महिलांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:58 PM2020-04-04T22:58:42+5:302020-04-04T23:00:02+5:30

‘कोरोना’मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गंगा-जमुना वस्तीतील महिलांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सामाजिक संवेदना जपत लकडगंज पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.

Lakdganj police in Nagpur express condolences: help to women in Ganga-Jamun | नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी जपली संवेदना : गंगा-जमुनातील महिलांना मदतीचा हात

नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी जपली संवेदना : गंगा-जमुनातील महिलांना मदतीचा हात

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गंगा-जमुना वस्तीतील महिलांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सामाजिक संवेदना जपत लकडगंज पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. सामाजिक संघटनांनी या संकटकाळात मदत पुरवावी, असे आवाहन लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
देहविक्रीत असलेल्या हजारच्यावर महिला या वस्तीमध्ये राहतात. या महिलांनी आपली कैफियत मांडली. अतिशय चिंचोळ्या खोलीत राहणाऱ्या या महिलांकडे किचनची व्यवस्थाही नाही. त्यांच्याकडे धान्य साठवून राहत नाही. दररोज दुकानातून धान्य आणून स्टोव्हवर बनविणे आणि जेवण करणे हा त्यांचा नित्यक्रम. लॉकडाऊनमुळे रोजची मिळकत बंद झाली आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कुणी मदत करणारे नाही आणि जवळ घेणारेही नाही, त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. माणूस म्हणून स्वीकारावे, सरकारने आमच्यासाठीही व्यवस्था करावी, अशी आर्त हाक वस्तीतील महिलांनी दिली. अशा कठीण परिस्थितीत लकडगंज पोलिसांनी या महिलांसाठी संवेदनेचा सेतू निर्माण केला. येथील महिलांच्या पोटाचा प्रश्न सुटावा, यासाठी पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक संघटनांना भेटून मदतीचे आवाहन केले. त्यामुळे काही संस्थांनी मदतीचा ओघ सुरू केला. सामाजिक सहकार्यातून आलेले दोन वेळचे अन्न व धान्य पोलिसांच्या माध्यमातूनच या महिलांच्या घरापर्यंत पोहचले आणि कायम बदनामी, अवहेलना झेलणाऱ्या या महिलांच्या वेदनांवर फुंकर पडली.
पोलीस झाले देवदूत, धावल्या संस्था
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या निर्देशानुसार आणि डीसीपी राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी काही स्थानिक व्यापारी, सामाजिक व धार्मिक संस्थांची भेट घेतली व महिलांच्या मदतीचे आवाहन केले. त्यानुसार अ.भा. काँग्रेस कमिटीचे महेंद्रसिंग व्होरा यांनी एक टन तांदूळ व २०० किलो डाळ वस्तीसाठी पाठविली. राधाकृष्ण ट्रस्टतर्फे दररोज सकाळ-संध्याकाळी ३०० फूड पॅकेट्स येत असल्याचे हिवरे यांनी सांगितले. जलाराम मंदिराकडूनही मदत देण्यात येत असून काही प्रतिष्ठित व्यापारी व समाजसेवकांकडूनही मदतीचा ओघ सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार कृष्णा खोपडे आणि समर्पण सेवा समितीनेही मदतीचा हात पुढे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी ही मदत वस्तीतील तरुणांच्या मदतीने घरोघरी पोहचविली. यामध्ये पोलीस चौकीचे महेंद्र क्षीरसागर, यशवंत थोटे, जगदीश परतेकी, राजेश सिडाम व खोब्रागडे हे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
जनजागृती आणि सॅनिटायझेशन
या महिलांना कोरोनाबाबत फारशी माहिती नव्हती. त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची त्यांची मानसिकता नव्हती. ही गोष्ट लक्षात घेत नरेंद्र हिवरे यांनी जनता कर्फ्यूच्या दिवशी संपूर्ण वस्तीत जनजागृती करून या धोक्याबाबत अवगत करण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये महिलांनी कामच बंद केले. दरम्यान, वस्तीत अस्वच्छता पसरली असल्याने सॅनिटायझेशन करण्याची विनंती त्यांनी केली. हिवरे यांनी नगरसेवक मनोज चाफले यांच्या सहकार्याने नियमित सॅनिटायझेशनची व्यवस्था केली.
अशी परिस्थिती पाहिली नाही
वस्तीत गेल्या २० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या एका महिलेने सांगितले, आजपर्यंत वस्ती इतक्या दिवसांसाठी कधी बंद पडली नव्हती. अशी परिस्थिती कधी निर्माण झाल्याचेही ऐकले नसल्याचे तिने स्पष्ट केले. पोलीस व सामाजिक संस्थांकडून आमची रोजची व्यवस्था होत असल्याचे तिने सांगितले.

१५ एप्रिलपर्यंत या महिलांसाठी आम्ही व्यवस्था करीत आहोत. यापुढेही परिस्थिती सुधारली नाही तर ही मदत कायम राहील. प्रसंगी आम्ही स्वत:च्या घरून धान्य पुरवठा करू पण त्यांना उपाशी झोपू देणार नाही.
- नरेंद्र हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लकडगंज

Web Title: Lakdganj police in Nagpur express condolences: help to women in Ganga-Jamun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.