पैशांच्या वादातून चाकुने वार, दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न
By दयानंद पाईकराव | Updated: April 27, 2024 16:55 IST2024-04-27T16:51:59+5:302024-04-27T16:55:54+5:30
Nagpur : वाचविण्यासाठी आलेल्या मित्रावरही चाकुने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Attempt to murder due to money dispute
नागपूर : पैशांच्या वादातून चार आरोपींनी युवकाला मारहाण करून त्याला वाचविण्यासाठी आलेल्या मित्रावरही चाकुने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतनगर चौकात बुधवारी २४ एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
आशिष उर्फ भांजा उत्तम पटेल (२०), हिमांशू सुनिल चुटले (१९) दोघे रा. अभिनव घरकुल योजना चिखली वस्ती कळमना, अयान शेख (२०) आणि सुलतान शेख २२) दोघे रा. म्हाडा कॉलनी, चिखली झोपडपट्टी अशी आरोपींची नावे आहेत. तर दिपक जगदिश सोनी (२४) आणि विक्की वर्मा अशी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. बुधवारी राक्षी १० वाजताच्या सुमारास दिपक आणि विक्की हे भरतनगर चौकात उभे होते. तेवढ्यात चारही आरोपी तेथे आले. आरोपींनी जुन्या पैशांच्या वादातून विक्कीसोबत भांडण सुरु केले. त्यानंतर दिपकने मध्यस्थी करून विक्कीला सर्जा बारजवळ नेले. दरम्यान पाठलाग करून आरोपीही तेथे पोहोचले. आरोपींनी पुन्हा भांडण केले. यात आरोपी अयानने दिपकच्या डोक्यावर चाकुने वार केला. तसेच आरोपी सुलतानने पोटावर व हातावर चाकुने वार करून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या दिपकला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी आशिष उर्फ भांजा आणि हिमांशूला अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.