मुलीची वेशभुषा करून अल्पवयीन मुलीचे अपहरण, पैशांचे आमिष दाखवून नेले मुंबईला

By दयानंद पाईकराव | Published: October 14, 2023 03:33 PM2023-10-14T15:33:44+5:302023-10-14T15:34:41+5:30

कारवाईच्या भितीने पाठविले परत

Kidnapping of a minor girl by dressing up as a girl; was lured by money to Mumbai | मुलीची वेशभुषा करून अल्पवयीन मुलीचे अपहरण, पैशांचे आमिष दाखवून नेले मुंबईला

मुलीची वेशभुषा करून अल्पवयीन मुलीचे अपहरण, पैशांचे आमिष दाखवून नेले मुंबईला

नागपूर : मुंबईला हॉटेलमध्ये डान्स केल्यास भरपूर पैसे मिळतात, अशी बतावणी करून मुलीची वेशभुषा केलेल्या एका आरोपीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. परंतु मुंबईत पोलिसांची धाड पडल्यामुळे आरोपीने मुलीला विमानात बसवून नागपुरात पाठविले. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑक्टोबरला फिर्यादीची १३ वर्षीय बहिण शाळेतून घरी न परतल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मुलीचा शोध घेतला असता तिच्या शाळेतील मैत्रीणीने ती जॉबसाठी मुंबईला जाणार असल्याची माहिती दिली. अल्पवयीन मुलीजवळ मोबाईल असल्यामुळे तिचे लोकेशन तपासून पाळत ठेवण्यात आली. अखेर १३ ऑक्टोबरला मुलगी परत आली. आपल्यासोबत कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याची माहिती तिने दिली. पोलिस फुस लाऊन पळवून नेणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

मुलीच्या वेशात मुलाने मुंबईला आणल्याचे समजताच बसला धक्का

मुलीच्या वेशभुषेत असलेल्या मुलाने अल्पवयीन मुलीला आर्थिक प्रलोभन दाखवून मुंबईला नेल्यानंतर ठाणे येथे ठेवले. त्यानंतर आरोपी आपल्या कामाला गेला. तेथे राहणाऱ्या एका मुलीने अल्पवयीन मुलीला तिच्यासोबत असलेली मुलगी नव्हे तर मुलगा असून तो वेटरचे काम करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे अल्पवयीन मुलीला धक्काच बसला. त्यानंतर पोलिसांची धाड पडल्यामुळे आरोपी तेथे परतला. कारवाईच्या भितीमुळे त्याने मुलीला नागपूरला येणाऱ्या विमानात बसवून दिले आणि या प्रकाराची कुणालाही माहिती देऊ नको, अशी धमकी दिली.

अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, उपनिरीक्षक मंगला हरडे, सुनिल वाकडे, दिपक बिंदाने, अशरीफ शेख, विलास चिंचुलकर, अश्विनी खोडपेवार यांनी केली.

Web Title: Kidnapping of a minor girl by dressing up as a girl; was lured by money to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.