पाचगाव झाले ‘खासगाव’

By Admin | Updated: November 24, 2014 01:21 IST2014-11-24T01:21:25+5:302014-11-24T01:21:25+5:30

पाचगावचा फक्त भौैतिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विकास करून हे गाव महाराष्ट्रात एक आदर्श गाव ठरेल असे प्रयत्न करू, असा संकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Khasgaon becomes 'Sasgaon' | पाचगाव झाले ‘खासगाव’

पाचगाव झाले ‘खासगाव’

राज्यात आदर्श गाव करणार : नितीन गडकरी यांचा संकल्प
नागपूर : पाचगावचा फक्त भौैतिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विकास करून हे गाव महाराष्ट्रात एक आदर्श गाव ठरेल असे प्रयत्न करू, असा संकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत गडकरी यांनी उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव दत्तक घेतले. या योजनेचा शुभांरभ रविवारी गडकरी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी पाचगावच्या विकासाबाबत असलेल्या संकल्पनेची मांडणी केली. गावाचा विकास करणे ही फक्त माझी किंवा अधिकाऱ्यांची जबाबदारी नसून गावातील नागरिकांचाही त्यात सहभाग असावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गाव व्यसनमुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. किमान कौशल्यावर आधारित रोजगार केंद्र सुरू करणे, महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, बँकेच्या माध्यमातून चार टक्के दराने कर्जपुरवठ्यासह अनेक योजनांची घोषणा गडकरी यांनी केली. पुढील १५ दिवसांनी गावात येऊन समस्यांची पाहणी करून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार कृपाल तुमाने व आमदार सुधीर पारवे यांची भाषणे झाली. यावेळी शौचालये बांधण्यासाठी ५ लाख १० हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीला देण्यात आला. ८५ लाभार्थ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले तर आभार सरपंच पुण्यशिला मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी खासदार दत्ता मेघे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदार, जि.प.सदस्यांना आवाहन
खासदाराप्रमाणेच आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांनीही एक गाव दत्तक घेऊन विकास करावा, यातून विकासाची स्पर्धा निर्माण होईल, असे गडकरी म्हणाले.

Web Title: Khasgaon becomes 'Sasgaon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.