केरळचा कळवळा, विदर्भातील शेतक-यांबाबत मौन; भाजप नेत्यांचे असेही समाजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 23:35 IST2017-10-09T23:35:40+5:302017-10-09T23:35:52+5:30
हत्यांचा निषेध करत असताना आपल्या मातीतील शेतकयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना रस्त्यावर का उतरावेसे वाटले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केरळचा कळवळा, विदर्भातील शेतक-यांबाबत मौन; भाजप नेत्यांचे असेही समाजकारण
नागपूर : शालेय पुस्तकांमध्ये आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी ही म्हण अनेकदा वाचनात येते. मात्र राजकीय पटलावर ही म्हण कशी चपखलपणे बसते हे भाजपच्या शहर कार्यकारिणीतील नेत्यांनी दाखवून दिले. विदर्भात अपु-या पावसामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजाचे मनोबल रासायनिक खताच्या फवा-यामुळे झालेल्या शेतकरी मृत्यूंमुळे ढासळले आहे. शेतकयांच्या या परिस्थितीबाबत मौन बाळगून असलेल्या भाजपच्या नेत्यांना हजारो किलोमीटर दूर असलेल्या केरळमधील भाजप कार्यकर्त्यांचा कळवळा आला. तेथील हत्यांचा निषेध करत असताना आपल्या मातीतील शेतकयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना रस्त्यावर का उतरावेसे वाटले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. संघाने यासंदर्भात कधी नव्हे ती उघडपणे भुमिका घेतली. भाजपतर्फे केरळात जनरक्षा यात्रेची मोहिम राबविण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील याला उपस्थित होते. उपराजधानीपासून १५०० किलोमीटर केरळमधील सत्ताधा-यांकडून होणा-या या राजकीय हिंसेचा निषेध करण्यासाठी व जनरक्षा यात्रेच्या समर्थनार्थ शहर भाजपतर्फे सोमवारी दुपारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.मिलींद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, महामंत्री संदीप जोशी, किशोर पलांदूरकर, संदीप जाधव, प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता, श्रीकांत देशपांडे, संजय बंगाले, धर्मपाल मेश्राम, इत्यादी नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. केरळ सरकारविरोधात यावेळी जोरजोराने नारे लावण्यात आले व जर हत्या थांबल्या नाहीत तर नागपुरातील भाजप कार्यकर्ते केरळमध्ये जाऊन शासनाला प्रत्युत्तर देतील, असे दावेदेखील करण्यात आले.
हजारो किलोमीटरवर सुरू असलेल्या हिंसेला नागपुरातून जाऊन उत्तर देण्याची भाषा करणाºया नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचा मात्र विसर पडला होता. रासायनिक खतांच्या फवाºयामुळे यवतमाळमध्ये झालेल्या जीवघेण्या घटनांचे लोण नागपूर जिल्ह्यातदेखील पसरले. शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जिल्ह्यातदेखील काही शेतकरी यामुळे आजारी पडले आहेत. सोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुºया पावसामुळे शेतकºयांना फटका बसला आहे. मात्र नागपूर शहरातील एकाही आमदाराने यासंदर्भात सरकारकडे मागणी केलेली नाही. इतकेच काय तर शेतकºयांच्या मृत्यूसंदर्भात सांत्वना देणारे साधे पत्रदेखील काढलेले नाही. केरळमधील हिंसा निषेधार्हच आहे. मात्र तेथील कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असताना भाजप नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचे अश्रू दिसले नाहीत का, असे प्रश्न संविधान चौकात उपस्थित असलेल्या जनसामान्यांमधूनच उपस्थित झाले.