कन्हैय्या बिल्डर्सला ग्राहक आयोगाची चपराक, अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणे अंगलट आले
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 30, 2024 18:11 IST2024-05-30T18:11:21+5:302024-05-30T18:11:40+5:30
टिळकनगर येथील दीप्ती माताडे यांनी कन्हैय्या बिल्डर्सच्या वाठोडा येथील गृह प्रकल्पामधील एक बंगला १२ लाख ३१ हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी करार केला होता.

कन्हैय्या बिल्डर्सला ग्राहक आयोगाची चपराक, अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणे अंगलट आले
नागपूर : सेवेत त्रुटी ठेवणे आणि अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणे कन्हैय्या बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सच्या अंगलट आले. या अवैध कृतीकरिता त्यांना अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची चपराक बसली.
टिळकनगर येथील दीप्ती माताडे यांनी कन्हैय्या बिल्डर्सच्या वाठोडा येथील गृह प्रकल्पामधील एक बंगला १२ लाख ३१ हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यानंतर त्यांनी २० ऑगस्ट २०१० पर्यंत कन्हैय्या बिल्डर्सला २ लाख ४० हजार रुपये अदा केले. उर्वरित रक्कम बांधकामाच्या टप्प्यानुसार देण्याचे ठरले होते. परंतु, कन्हैय्या बिल्डर्सने बंगल्याचे बांधकाम सुरूच केले नाही. त्याबद्दल विचारणा केली असता सतत उडवाउडवीची उत्तरे दिली. कायदेशीर नोटीसचीही दखल घेतली नाही. परिणामी, माताडे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष सतीश सप्रे व सदस्य स्मिता चांदेकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता तक्रार अंशतः मंजूर करून माताडे यांचे २ लाख ४० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश कन्हैय्या बिल्डर्सला दिला. व्याज २१ ऑगस्ट २०१० पासून लागू करण्यात आले. तसेच, माताडे यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी ३५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कम कन्हैय्या बिल्डर्सनेच द्यायची आहे.