जरा हटके! वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतलेला ‘ट्री मॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:44 AM2020-03-16T11:44:53+5:302020-03-16T11:46:21+5:30

वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत प्रामाणिकतेने वृक्षांची सेवा करतानाच इतरांनाही वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करणारे राजिंदरसिंह खऱ्या अर्थाने ‘ट्री मॅन’ ठरले आहेत.

Just different! Tree Man for Tree Growing | जरा हटके! वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतलेला ‘ट्री मॅन’

जरा हटके! वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतलेला ‘ट्री मॅन’

Next
ठळक मुद्देराजिंदरसिंह यांनी लावले ६४१ वृक्षपरिचितांना भेट दिली शेकडो रोपटी

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपले भविष्य सुरक्षित आणि पुढच्या पिढीपर्यंत स्वच्छ पर्यावरण आणि शुद्ध हवा उपलब्ध ठेवायची असेल तर आजपासून वृक्षसंवर्धनाशिवाय तरणोपाय नाही. ही जाणीव बाळगून काही लोक प्रामाणिकपणे वृक्षसंवर्धनासाठी झटत असतात. वृक्षांप्रति अतोनात प्रेम आणि श्रद्धा असलेले राजिंदरसिंह प्लाया हे सुद्धा असेच व्यक्तिमत्त्व होय. वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत प्रामाणिकतेने वृक्षांची सेवा करतानाच इतरांनाही वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करणारे राजिंदरसिंह खऱ्या अर्थाने ‘ट्री मॅन’ ठरले आहेत.
मिसाळ ले-आऊट, जरीपटका येथील राजिंदरसिंह हे सामान्य व्यक्तिमत्त्व. गुरुनानक फार्मसी महाविद्यालयाच्या वाचनालयात ते कार्यरत आहेत. मात्र वृक्षसंवर्धनासाठी त्यांचा सेवाभाव असामान्य आहे. अचानक हा भाव जागृत होण्यासाठी कारणही तसे आहे. त्यांच्यानुसार पूर्वी कोराडी मार्गाने जाताना रस्त्याच्या कडेला दिसणारी वृक्षवल्ली आनंददायी वाटायची. मात्र एकदा पत्नीसोबत त्या मार्गाने जाताना हे वृक्ष कटले होते. त्या रस्त्यावर मोठे उड्डाण पूल तयार होत होते. हे पाहताना दु:ख झाले आणि त्याच वेळी वृक्षांच्या संवर्धनाचा निर्धारही केला. घरापासूनच याची सुरुवात केली. आंबा, चिकू अशी फळझाड आणि फुलझाडांची लागवड करून अंगण हिरवेगार केले. मग कॉलेजमध्ये अनेक वृक्षांची लागवड केली. मग ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्यावर राजिंदरसिंह यांनी वृक्ष लागवड सुरू केली. नातेवाईक, वस्तीतील लोक, परिचित अशा मिळेल त्यांच्या घरी, मिळेल त्या जागी वेगवेगळ्या प्रजातींचे रोपटे लावणे सुरू केले. लोक संवर्धन करावे म्हणून जास्तीत जास्त फळझाडांची लागवड केली. रस्त्यावर निव्वळ लागवड केली नाही तर त्या वृक्षांचे दररोज पाणी टाकून संवर्धनही केले. विविध शाळा, लोकांचे घर, मंदिरे अशा सर्व ठिकाणी त्यांनी लागवड केली. अशाप्रकारे दोन अडीच वर्षात त्यांनी ६४१ वृक्षांची लागवड आणि संवर्धन चालविले आहे. यात त्यांच्या कुटुंबाचीही त्यांना साथ मिळाली.
हा सिलसिला सुरू असताना लोकांना भेट म्हणून रोपटे देण्याची कल्पना त्यांना रुचली. मग काय, कुणाचा वाढदिवस, कुणाचे लग्न, रिसेप्शन, सत्कार असा कुठलाही कार्यक्रम असला की राजिंदरसिंह यांच्याकडून वृक्षभेट गेलीच पाहिजे, हा नित्यक्रम. लोक फुलांचे बुके फेकतात पण रोपटे सांभाळून ठेवतात याचे त्यांना समाधान आहे. अशाप्रकारे अनेकांना शेकडो रोपटे त्यांनी भेट दिले.
सार्वजनिक ठिकाणच्या झाडांना कठडे लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कधी नगरसेवकांना मागून तर अनेकदा स्वत:च्या खर्चाने आणून त्यांनी ते वृक्षांभोवती लावले आहेत. आतातर उन्हापासून संरक्षणासाठी हिरवी ताडपत्री लावण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे. अशाप्रकारे राजिंदरसिंह वृक्ष जगविणारे, वाढविणारे व इतरांना प्रोत्साहित करणारे ट्री मॅन झाले आहेत.

वर्षभरापूर्वी घराजवळ लावलेल्या फळझाडांना आंबे, चिकू आणि पेरू लागले आहेत. आपण लावलेल्या झाडांना फळ आल्याचे दृश्य पाहून खरेच समाधान वाटते. समाजाने माझ्यावर उपकार केले आहेत, आपणही काही करणे हे कर्तव्य आहे आणि वृक्षसंवर्धनासारखी दुसरी परतफेड ठरू शकत नाही.
- राजिंदरसिंह प्लाया, वृक्षप्रेमी

Web Title: Just different! Tree Man for Tree Growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.