पाच जिल्ह्यात जूनचा पाऊस सरासरीच्या खालीच
By निशांत वानखेडे | Updated: June 30, 2025 20:16 IST2025-06-30T20:01:54+5:302025-06-30T20:16:54+5:30
नागपुरात सर्वात कमी, भंडाऱ्यात ४० टक्क्याची कमतरता : वाशिम, बुलढाण्यात जादा

June rainfall below average in five districts
नागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यात जून महिन्यातील पाऊस निराश करणारा ठरला. नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी ४४ टक्के कमी पावसाची नाेंद झाली. त्याखाली भंडाऱ्यात ४० टक्के कमी पाऊस झाला. बुलढाण्यात जादा, तर गडचिराेली, वाशिम व अकाेल्यात सरासरी पाऊस झाला. एकूणच विदर्भाची महिन्यातील सरासरी १२ टक्क्याने कमी आहे, पण ती सामान्य मानली जाते.
अनेक वर्षानंतर यंदा मान्सून महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही अतिशय लवकर दाखल झाला खरा, पण ताे पुढे पाेहचलाच नाही. तब्बल २२ दिवस ताे एकाच ठिकाणी रेंगाळत राहिला. सर्वच जिल्ह्यात पाेहचण्यासाठी उशीरही झाला. साधारणत: २३ जूनच्या रात्रीपासून बहुतेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर उघडझाप करीत आनंदसरी बरसल्या, पण त्यातही सातत्य नव्हते. केवळ वाशिम, बुलढाणा व अकाेला जिल्ह्यात मुसळधार पावसाने झाेडपले. त्यामुळे पेरणी केलेल्या धान्याच्या राेपांचीही नासधुस झाली. इतर जिल्ह्यात मात्र पावसाने निराश केले. महिना संपण्याच्या आदल्या दिवशीपासून चांगल्या पावसाचा अनुभव येत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया व यवतमाळात जाेरदार सरी बरसल्या, तर इतर जिल्ह्यात रिपरिप सुरू हाेती. विदर्भासह मध्य भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने पुढचे काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जून महिन्यात झालेला पाऊस (मि.मी.)
जिल्हा सामान्य पाऊस झालेला पाऊस कमी/जास्त/सामान्य
नागपूर १७३.९ ९७.९ -४४
भंडारा १८७.४ १११.८ -४०
अमरावती १४९.५ १०० -३३
गाेंदिया १९६.५ १३५.२ -३०
वर्धा १७०.२ १३५.२ -२१
चंद्रपूर १८८.५ १७३.७ -८ (सामान्य)
गडचिराेली २२०.१ २१७.८ - १ (सामान्य)
यवतमाळ १७३ १६९.९ - २ (सामान्य)
अकाेला १४३.६ १४३.२ 0 (सामान्य)
वाशिम १७४.७ १८३.१ + ५ (सामान्य)
बुलढाणा १३५.९ १८१.१ + ३३ (अधिक)
विदर्भात एकूण १७५.४ १५५.२ - १२ (सामान्य)
साेमवारच्या पावसाने शेतीला संजीवनी
जूनचा शेवटचा दिवस साेमवारी विदर्भात पावसाने जाेरदार हजेरी लावली. सकाळपर्यंत चंद्रपूर व गाेंदियात ४३ मि.मी., भंडारा २२, गडचिराेली २० व यवतमाळात ११.४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. इतरही जिल्ह्यात पावसाची रिपरिप चालली हाेती. दिवसभरातही थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या. नागपूर जिल्ह्यात सायंकाळी पावसाने चांगलाच जाेर दाखवला. या पावसामुळे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.