पदार्थांना सुरक्षित ठेवणारे उपकरण तयार करून मिळविले आंतरराष्ट्रीय पेटंट; नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संशोधन
By आनंद डेकाटे | Updated: October 31, 2025 20:01 IST2025-10-31T19:59:54+5:302025-10-31T20:01:41+5:30
Nagpur : रसायनशास्त्र विभागातील दिवंगत डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी २०२० मध्ये त्यांच्या विद्यार्थिनी प्राची प्रदीप खोब्रागडे यांना या उपकरणाची कल्पना दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले हे संशोधन आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

International patent obtained for creating a device that preserves food; Research by students from Nagpur University
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दैनंदिन जीवनात संसर्ग होत विविध पदार्थ नष्ट होतात. या पदार्थांना संसर्गापासून रोखत निर्जंतुकीकरणासह पदार्थांना सुरक्षित ठेवणारे नाविन्यपूर्ण उपकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. 'अँटीमायक्रोबियल कोटिंग ऍप्लिकेशन वैद्यकीय उपकरण' विकसित करण्यासह आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवित विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरु डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रसायनशास्त्र विभागातील दिवंगत डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी २०२० मध्ये त्यांच्या विद्यार्थिनी प्राची प्रदीप खोब्रागडे यांना या उपकरणाची कल्पना दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले हे संशोधन आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. यूकेमध्ये या उपकरणाची डिझाइन नोंदणी झाल्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.
या प्रकल्पात प्राची खोब्रागडे यांच्यासोबत मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभागातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यजुर्वेद नरहरी सेलोकर आणि रसायनशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र डोंगरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यजुर्वेद सेलोकर यांच्या सहयोगाने या टीमने हे संशोधन पूर्णत्वास नेले. दैनंदिन जीवनात संसर्गाला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक वस्तूंना स्वच्छ ठेवण्याची ही एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धत ठरणार आहे.
हे यश प्राची प्रदीप खोब्रागडे, डॉ. राजेंद्र सुखदेवराव डोंगरे आणि यजुर्वेद नरहरी सेलोकर यांच्या नावे नोंदवले गेले आहे. हे पेटंट म्हणजे डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या बौद्धिक वारशाला दिलेली गुरुदक्षिणाच आहे.
कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर करडे आणि मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले यांनी संशोधकांच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे.
कोविडनंतरच्या काळात महत्त्वाचे संशोधन
कोविड-१९ च्या साथीनंतर लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. आपण हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापरतो, पण अनेक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तू ज्या धुता येत नाहीत, त्या स्वच्छ ठेवणे एक आव्हान होते. यावर उपाय म्हणून विकसित केलेले हे उपकरण अशा वस्तूंवर अँटीमायक्रोबियल थर चढवते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.