इंडिगोचे मुंबई फ्लाइट रद्द, तर दिल्लीची विमाने चार तास उशिराने ; नागपूर विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:49 IST2025-12-19T12:49:00+5:302025-12-19T12:49:40+5:30
Nagpur : विदर्भातील कडाक्याची थंडी आणि उत्तर भारतातील दाट धुक्याचा मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. गुरुवारी नागपूर विमानतळावर विमानांच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

IndiGo's Mumbai flight cancelled, Delhi flights delayed by four hours; Passengers in huge trouble at Nagpur airport
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील कडाक्याची थंडी आणि उत्तर भारतातील दाट धुक्याचा मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. गुरुवारी नागपूरविमानतळावर विमानांच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. इंडिगोची मुंबई-नागपूर-मुंबई फ्लाइट रद्द करण्यात आली, तर एअर इंडियाची दिल्ली फ्लाइट तब्बल चार तास उशिराने धावली.
इंडिगोचे 'ग्रहण' कायम; मुंबईची फ्लाईट रद्द
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानसेवेला घरघर लागली आहे. गुरुवारी मुंबईहून नागपूरला येणारे विमान (६३-२७३८) आलेच नाही, परिणामी नागपूरहून मुंबईला जाणारी फ्लाइट (७३-२७३९) रद्द करावी लागली. ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. याशिवाय मुंबईहून येणारी आणि जाणारी इतर विमानेही ४० मिनिटे ते १ तास उशिराने धावत होती.
दिल्ली मार्गावर दाट धुक्यामुळे विमानांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे. गुरुवारी एअर इंडियाच्या नागपूर-दिल्ली विमान काही मिनिटे नव्हे, तर तब्बल ४ तास उशिराने झेपावले. पहाटेच्या वेळी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
इतर शहरांच्या विमानांनाही फटका
केवळ मुंबई आणि दिल्लीच नाही, तर पुणे, गोवा, इंदूर आणि बंगळुरू येथून येणारी विमानेदेखील दीड ते दोन तास उशिराने नागपुरात पोहोचली. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकांना लैंडिंगसाठी ताटकळत राहावे लागत आहे.
प्रवाशांचा संताप
विमान कंपन्या तांत्रिक कारणे किंवा हवामानाचे नाव सांगतात, पण विमानतळावर प्रवाशांच्या बसण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात कंपन्या अपयशी ठरत असल्याची भावना एका त्रस्त प्रवाशाने व्यक्त केली.
दिल्ली मार्गावरील विमानांची स्थिती
विमान क्रमांक मार्ग विलंब
एआय-४१६ - नागपूर-दिल्ली ४ तास
६३-६०२० - नागपूर-दिल्ली १ तास
६३-६६९७ - नागपूर-दिल्ली १.३० तास
६३-६६१८ - नागपूर-दिल्ली १.३० तास
एआय-४१५ - दिल्ली-नागपूर ३.४० तास
६३-६६१९ - दिल्ली-नागपूर ५० मिनिटे
६३-६६९६ - दिल्ली-नागपूर २.४० तास
६३-६५६९ - दिल्ली-नागपूर ३ तास