मस्कत-कोची-दिल्ली मार्गावरील इंडिगोच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 17, 2025 18:11 IST2025-06-17T18:09:32+5:302025-06-17T18:11:23+5:30

Nagpur : विमान तपासणीनंतर दुपारी ३ वाजता दिल्लीकडे रवाना

IndiGo flight on Muscat-Kochi-Delhi route makes emergency landing in Nagpur | मस्कत-कोची-दिल्ली मार्गावरील इंडिगोच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग

IndiGo flight on Muscat-Kochi-Delhi route makes emergency landing in Nagpur

मोरेश्वर मानापुरे
नागपूर : इंडिगोला विमानात बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल मिळाल्यानंतर मस्कत-कोची-दिल्ली मार्गावरील इंडिगोच्या विमानाचे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास नागपूरविमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात १५७ प्रवासी होते. तपासणीनंतर हे विमान दुपारी ३ वाजता दिल्लीकडे रवाना झाले,

६ ई २७०६ क्रमांकाचे विमान सकाळी ९.२० वाजता कोची विमानतळावरून उड्डाण घेऊन दुपारी १२.३५ वाजता दिल्लीत उतरणार होते. इंडिगो कंपनीला विमान क्रमांकाचा उल्लेख करून विमानात बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल मिळाल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन, विमान नागपूरला वळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला तात्काळ माहिती देण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आणि संपूर्ण विमान आणि प्रवाशांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान चौकशी अधिकाऱ्यांना काहीही आढळले नाही. या घटनेची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळल्यापासून उड्डाणांबाबत सुरक्षा आणि चिंता वाढली आहे.

पोलिस उपायुक्त लोहित मतानी म्हणाले, आपत्कालीन लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. विमानतळ सुरक्षा आणि बॉम्ब निकामी पथकांनी तातडीने सखोल तपासणी आणि चौकशी केली. विमानात संशयास्पद काहीही आढळले नाही. तपास सुरू असताना खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Web Title: IndiGo flight on Muscat-Kochi-Delhi route makes emergency landing in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.