भारतात पहिली मोफत मानसिक आरोग्य हेल्पलाइन सुरू ; तणावाने त्रस्त डॉक्टर्ससाठी दिलासा
By सुमेध वाघमार | Updated: August 21, 2025 18:38 IST2025-08-21T18:38:10+5:302025-08-21T18:38:58+5:30
Nagpur : वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टरांसाठी आता मानसिक आरोग्य हेल्पलाइन

India's first free mental health helpline launched; relief for doctors suffering from stress
नागपूर: देशातील वैद्यकीय क्षेत्रात वाढलेल्या कामाच्या ताणामुळे अनेक विद्यार्थी आणि डॉक्टरांवर मानसिक दबाव वाढत आहे, ज्यामुळे काहीजण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, देशभरातील निवासी डॉक्टरांची राष्ट्रीय संघटना 'फेडरेशन आॅफ आॅल इंडिया मेडिकल असोसिएशन' (फायमा) यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांसाठी पूर्णपणे मोफत आणि समर्पित मानसिक आरोग्य हेल्पलाइन सुरू केली आहे. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचे मानले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशभरात डॉक्टरांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागपूरच्या ‘एम्स’मधील एका हुशार विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नुकतीच झालेली घटना किंवा मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमधील एका निवासी डॉक्टरने अटल सेतूवरून उडी मारून केलेली आत्महत्या या घटनांनी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडले आहे. या वाढत्या तणावामुळे होणाºया आत्महत्या थांबवण्यासाठी ‘फायमा’ने पुढाकार घेतला आहे. ही हेल्पलाइन वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांसाठी एक संजीवनी ठरणार आहे.
५० हून अधिक मानसोपचार तज्ज्ञ
या हेल्पलाइनमध्ये सुमारे ५० पेक्षा जास्त मानसोपचार तज्ज्ञ आपली सेवा देणार आहेत. यामुळे मदतीची गरज असलेल्या प्रत्येकापर्यंत वेळेवर पोहोचणे शक्य होणार आहे.
आठ भाषांमधून संवाद
मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, तेलगू, कन्नड, तामीळ आणि मल्याळम या आठ भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे, ज्यामुळे देशभरातील कोणत्याही भागातील विद्यार्थी आणि डॉक्टर त्यांच्या मातृभाषेत संवाद साधू शकतील.
दिवसाला २० तास सेवा
ही हेल्पलाइन आठवड्यातील सातही दिवस, दररोज २० तास कार्यरत असेल. यामुळे गरजू व्यक्तीला रात्री-अपरात्रीही मदत मिळू शकेल. ‘फायमा’चे माजी राष्ट्रीय सचिव डॉ. सजल बन्सल यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. डॉ. मनीष जांगडा आणि डॉ. अक्षय डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत आहे. झारखंडचे डॉ. जयदीप चौधरी, महाराष्ट्राचे डॉ. सजल बन्सल आणि आंध्रचे डॉ. श्रीनाथ हेल्पलाइनचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
हेल्पलाइनची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
हा अभिनव उपक्रम वैद्यकीय क्षेत्रातील तणाव कमी करून, मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘फायमा’चे डॉ. रोहन कृष्णन, डॉ. सुरवानकर दत्ता, डॉ. संदीप डागर आणि इतर सदस्य या हेल्पलाइनची माहिती प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि निवासी डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.