अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यास भारत समर्थ; राष्ट्रसेविका समिती प्रमुख संचालिका यांचे मत

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 28, 2025 23:41 IST2025-09-28T23:41:08+5:302025-09-28T23:41:28+5:30

'जेन झी'ला योग्य दिशा दाखवणे आवश्यक

India is capable of responding to US tariffs; says Rashtrasevika Samiti chief director | अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यास भारत समर्थ; राष्ट्रसेविका समिती प्रमुख संचालिका यांचे मत

अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यास भारत समर्थ; राष्ट्रसेविका समिती प्रमुख संचालिका यांचे मत

राकेश घानोडे, नागपूर: जगामध्ये आज भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावर आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे नवीन भारत अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यास आणि चीनसोबत स्पर्धा करण्यास समर्थ आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांता कुमारी यांनी व्यक्त केले.

समितीच्या नागपूर महानगर शाखेच्यावतीने रविवारी सायंकाळी रेशीमबागेतील स्मृती मंदिर येथे शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कमिटी ऑन पब्लिक ॲण्ड गव्हर्नमेंट फायनान्सियल मॅनेजमेंटच्या अध्यक्ष सीए केमिशा सोनी व समितीच्या प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. समितीला 'वसुधैव कुटुंबकम' या सिद्धांतानुसार कार्य करायचे आहे. आज भारताची आध्यात्मिक जीवनदृष्टी संपूर्ण जगाला प्रभावित करीत आहे. भारत विविधतेने नटलेला देश आहे. असे असतानाही एकता अखंडित आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन नेहमीच शांततेत होते. महिलांना श्रेष्ठ संतान जन्माला घालण्याचे वरदान लाभले आहे. त्यांनी मातृत्वभाव कायम ठेवून सर्व क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. त्यातून त्या देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील. महिलांनी या नवरात्रीपासून स्वदेशी वस्तू व विचार अंगीकारण्याचा संकल्प करावा, असेही व्ही. शांता कुमारी यांनी सांगितले. महानगर कार्यवाहिका करुणा साठे यांनी प्रास्ताविक तर, सोनाली गायकवाड यांनी संचालन केले.

'जेन झी'ला योग्य दिशा दाखवणे आवश्यक

नेपाळ व लडाखमध्ये 'जेन झी'ने केलेली हिंसक कृती अशोभनीय आहे. त्यांनी अशांती व्यक्त करण्यासाठी हिंसा करू नये. 'जेन झी'ला योग्य दिशा दाखवण्याचे कर्तव्य सर्व नागरिकांचे आहे. 'जेन झी'ला चारित्र्यसंपन्न योद्धे म्हणून तयार केल्यास सुदृढ समाजाचा पाया रचला जाईल. तसेच, त्यांच्या माध्यमातून देश विश्वगुरू बनू शकतो, याकडेदेखील व्ही. शांता कुमारी यांनी लक्ष वेधले.

देशाच्या शक्ती आहेत महिला - सीए केमिशा सोनी

भारतीय महिला शक्तीच्या रुप आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. देशाच्या विकासात त्यांचे योगदान मौल्यवान आहे. आता त्यांनी देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी कार्य करावे. सरकारने महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. समितीने त्या योजना शेवटच्या महिलेपर्यंत घेऊन जाव्या. महिलांनी गुंतवणुकीमध्ये सहभागी व्हावे, असे सीए केमिशा सोनी यांनी सांगितले.

Web Title: India is capable of responding to US tariffs; says Rashtrasevika Samiti chief director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.