खरेच, पिक्चर अभी बाकी है... नरवणे यांच्या वक्तव्याला निवृत्त एअर मार्शल विभास पांडेंचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:07 IST2025-05-08T12:05:33+5:302025-05-08T12:07:07+5:30
Nagpur : फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' पासून सावधान

Indeed, the picture is still pending... Retired Air Marshal Vibhas Pandey confirms Naravane's statement
फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. यावर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी ट्रीट करीत, 'पिक्चर अभी बाकी है', असे म्हटले आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल विभास पांडे यांनीही याला दुजोरा देत खरोखरच 'पिक्चर अभी बाकी है' असे म्हटले आहे.
निवृत्त एअर मार्शल विभास पांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना, पाकिस्तानने भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला तर भारतीय सैन्याकडून असे आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे, असे संकेत दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या १०० किमी आत घुसून बहावलपूरला लक्ष्य केले आहे. जर पाकिस्तानने प्रत्युत्तराच्या नावाखाली काही केले तर भारतीय सैन्यात आणखी खोलवर घुसण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला आणखी वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' पासून सावधान
एअर मार्शल विभास पांडे यांनी, आजच्या युद्धासारख्या परिस्थितीत प्रत्येकाने 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' ची वाईट सवय सोडून देण्याचे आवाहन केले. पाकिस्तानला सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे युद्ध लढत राहू द्या. त्यामुळे, कोणतीही पोस्ट किंवा संदेश त्वरित फॉरवर्ड करण्याची सवय प्रत्येकाने टाळणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, भारताच्या हिताचे नसलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करणे सर्वांसाठी चांगले राहील.
चर्चा मॉक ड्रिलची आणि निकाल लावला
विभास पांडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरात २५९ ठिकाणी मॉक ड्रिलची घोषणा केली होती. सर्वजण याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र अचानक पहाटे पाकिस्तानात ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याची बातमी धडकली. त्यावरून 'चर्चा चाचणीची होती आणि हाती निकाल दिला' असे झाले आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान लाऊडस्पीकर लावून नागरिकांना जागरूक करत असे. आता ती परिस्थिती नाही. सोशल मीडियाचे शक्तिशाली माध्यम उपलब्ध आहे. मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहावे.