योगविद्येचा अभ्यासक्रमांत समावेश करा
By Admin | Updated: March 15, 2015 02:14 IST2015-03-15T02:14:46+5:302015-03-15T02:14:46+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी योगविद्येसंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला.

योगविद्येचा अभ्यासक्रमांत समावेश करा
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी योगविद्येसंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. योगविद्येचा प्रसार करणे आवश्यक असून केंद्र व राज्य शासनांनी याला शैक्षणिक अभ्यासक्रमांत स्थान द्यावे, अशी सूचना या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात आली व याला एकमताने संमत करण्यात आले.
सभेच्या दुसऱ्या दिवशी हा प्रस्ताव मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्राने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघ, याबाबत प्रस्ताव मांडणारे व अनुमोदन देणारे देश, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगभरात योगविद्येचा प्रसार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांचे आभार मानण्यात आले.
योगविद्येचा प्रसार करण्यासाठी केंद्र व राज्य शासनांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी योगविद्येत संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत प्रतिनिधींकडून मांडण्यात आले. दरम्यान, संघप्रणीत शिक्षण संघटनांनी वर्षभराचा लेखाजोखा प्रतिनिधी सभेसमोर मांडला. शिवाय संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. यात संघशाखांचा विस्तार, भविष्यातील रणनीती यांचा उल्लेख झाला.(प्रतिनिधी)
केंद्रासोबत समन्वयाची आवश्यकता नाही
केंद्र शासनासमवेत समन्वयासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु केंद्र शासनात संघशिस्तीतूनच घडलेल्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याशी समन्वय राखण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता नाही. त्यांना सल्ला देण्याची किंवा त्यांच्या कामात दखल देण्याची गरज संघाला वाटत नाही. केंद्रातील नेते सक्षम आहेत, असे मत संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांनी व्यक्त केले.
संघस्थानी मुख्यमंत्री, गडकरींची भेट
दरम्यान, अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू असतानाच शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. त्यांनी प्रतिनिधी सभेत उपस्थिती लावली नाही, परंतु परिसरात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल हे या प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत. संघप्रणीत इतर संघटनांप्रमाणे भाजपाकडून २०१४-१५ या वर्षाचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात या नेत्यांनी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संघ गणवेशात होऊ शकतो बदल
संघाच्या गणवेशात बदल होण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चांना ऊत आला आहे. याबाबत संघातर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आली. संघाच्या गणवेशात वेळोवेळी बदल झाले आहेत. आद्यसरसंघचालक डॉ. केशब बळीराम हेडगेवार यांच्या काळातील आणि आताच्या गणवेशात बराच फरक आहे. मागील सभेत संघाच्या ‘बेल्ट’मध्ये बदल झाला. संघाची ओळख ही गणवेश नसून सेवाकार्य आहे. त्यामुळे भविष्यात गणवेशात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख जे. नंदकुमार यांनी व्यक्त केले.