पाकिस्तानातून परतलेल्या सुनिताच्या मोबाइलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप्स

By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 23:39 IST2025-06-04T23:39:32+5:302025-06-04T23:39:53+5:30

फॉरेन्सिक विश्लेषण सुरू : एनआयएच्या पथकाने मागविले प्रकरणाचे सगळे तपशील

In Nagpur, Two suspicious Pakistani apps found in Sunita's mobile after returning from Pakistan | पाकिस्तानातून परतलेल्या सुनिताच्या मोबाइलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप्स

पाकिस्तानातून परतलेल्या सुनिताच्या मोबाइलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप्स

योगेश पांडे 

नागपूर : एलओसी ओलांडून पाकिस्तानात जाणाऱ्या सुनिता या महिलेच्या मोबाइलच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्या मोबाइलमधून दोन संशयास्पद पाकिस्तानी ॲप्स आढळल्या आहेत. सुनिता काही दिवस पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होती. त्यामुळे त्या ॲप्स पाकिस्तानी एजन्सीजने इन्स्टॉल केले का, याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

सुनिता १४ मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली. ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक झुल्फिकारला भेटणार होती. याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले होते. चौकशीनंतर तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आले. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला कारागृहात पाठविण्यात आले होते. पोलिसांनी तिच्या मोबाइलची सायबर तज्ज्ञांकडून तपासणी केली. त्यात प्राथमिकदृष्ट्या तर कुठले मालवेअर आढळले नाही. मात्र, दोन पाकिस्तानी ॲप्स मात्र आढळले. सायबर तज्ज्ञांनी तिचे चॅट्स रिकव्हर केले आहेत. त्यात तिने काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेमस्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणे सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यानंतर चॅटिंगची दिशा भलत्याच दिशेने गेल्याचे दिसून आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली. एनआयएच्या मुंबई पथकाने नागपूर पोलिसांशी संपर्क केला असून, काही प्रश्नांची यादी पाठविली आहे. या एकूण प्रकरणाची माहिती घेतल्यावर यात दहशतवादी ॲंगल आहे का, हे ठरवून त्यांचे विशेष पथक नागपुरात चौकशीसाठी येईल.

स्थानिक नागरिकाने दिली होती ‘लिफ्ट’
सुनिता तिच्या मुलासोबत श्रीनगरवरून कारगिलला गेली होती. तिला एका स्थानिक व्यक्तीने लिफ्ट दिल्याची माहिती समोर आली. तिच्या मुलानेदेखील याला दुजोरा दिला आहे. संबंधित स्थानिक व्यक्तीला कारगिल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. दरम्यान, कारगिल पोलिसांचे पथक मंगळवारी नागपूरला पोहोचले. तेथील स्थानिक विशेष ॲक्टनुसार कारगिल पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारगिल पोलिसांच्या पथकाने प्राथमिक चौकशी केली व त्यांना तिची कस्टडी हवी आहे. त्यांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला. प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर, सुनिताला चौकशीसाठी कारगिलला नेले जाईल.

Web Title: In Nagpur, Two suspicious Pakistani apps found in Sunita's mobile after returning from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.