क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले.. गोपीच्या संघर्षाने सावरणार होते मुलांचे भविष्य
By जितेंद्र ढवळे | Updated: March 2, 2026 13:45 IST2026-03-02T13:44:10+5:302026-03-02T13:45:23+5:30
Nagpur : आईच्या मायेची आस... क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले. आज त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत प्रश्नच प्रश्न आहेत. आईच्या हातचा घास, तिचा मायेचा स्पर्श आणि आधार देणारा हात सगळे काही एका क्षणात नाहीसे झाले.

In an instant, the mother's loving care over the lives of two little ones was lost.. Gopi's struggle was going to save the children's future.
जितेंद्र ढवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईच्या मायेची आस... क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले. आज त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत प्रश्नच प्रश्न आहेत. आईच्या हातचा घास, तिचा मायेचा स्पर्श आणि आधार देणारा हात सगळे काही एका क्षणात नाहीसे झाले. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले तिचे पाऊल अखेर तिच्याच आयुष्याचे शेवटचे ठरले आणि दोन चिमुकल्यांना आयुष्यभरासाठी आईच्या मायेची आस लावून गेले. गोपीच्या मुलांना कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत लढा देऊ अशी भूमिका कमल हिने 'लोकमत'कडे मांडली.
राऊळगाव येथील एसबीएल कंपनीमधील भीषण दुर्घटनेत गोपी किशोर कोते या कष्टकरी आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन निष्पाप लेकरांच्या आयुष्यावर कायमची पोकळी निर्माण झाली आहे. घरातील वाद, आर्थिक संकट आणि अस्थिर वातावरण यांना सामोरे जात गोपी यांनी मुलांच्या भविष्यासाठी धाडसी निर्णय घेतला होता. १२ वर्षाचा मुलगा हिमांशू आणि ८ वर्षाची मुलगी दीक्षा यांना उच्च शिक्षण द्यायचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे हा तिचा ठाम निर्धार होता.
यासाठी तिने तांदूळवाणी हे गाव सोडून काटोल शहरात भाड्याने छोटी खोली घेतली. संसाराचा गाडा एकटीने ओढत ती नोकरीच्या शोधात होती आणि अखेर कंपनीत कामाला लागली. कंपनीच्या पगारावरच घरखर्च, शाळेची फी, पुस्तके, वह्या आणि भविष्यासाठीची बचत सुरू होती. पहाटे उठून कामाची धावपळ, मुलांची काळजी आणि दिवसभराचा कष्टाचा प्रवास. हेच तिचे आयुष्य झाले होते. तिच्या चेहऱ्यावर थकवा असला, तरी डोळ्यांत मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने चमकत होती. मात्र, नियतीला हे स्वप्न मान्य नव्हते. चार दिवसांपूर्वीच याच कंपनीत काम करणारी तिची चुलत बहीण कमल श्रीरामे हिला गोपीने माझा या कंपनीतला शेवटचा महिना असल्याचे सांगितले होते. कंपनीतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या वागणुकीतून तिने ही भूमिका मांडल्याचे कमल हिने सांगितले. मात्र, गोपीचे वाक्य खरे ठरले. नियतीने आणि कंपनी व्यवस्थापनाच्या बेजबाबदार वृत्तीने तिचा जीव गेला.
सकाळी कामावर गेलेल्या गोपी यांना काय ठाऊक, तो दिवस तिच्या आयुष्याचा अखेरचा ठरेल? अचानक झालेल्या भीषण स्फोटात ती गंभीर जखमी झाली आणि उपचारांपूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.