अंबाझरी वन संरक्षण निर्णयांवर अंमलबजावणी करा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:22 IST2019-08-26T22:22:06+5:302019-08-26T22:22:49+5:30

अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

Implement Ambazari Forest Protection Decisions | अंबाझरी वन संरक्षण निर्णयांवर अंमलबजावणी करा : हायकोर्टाचा आदेश

अंबाझरी वन संरक्षण निर्णयांवर अंमलबजावणी करा : हायकोर्टाचा आदेश

ठळक मुद्देव्यवस्थापन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त सादर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीने गेल्या ३० जुलै रोजी अंबाझरी वन संरक्षणासंदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीचे इतिवृत्त न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच, वन विभागाने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यातील बाबी लक्षात घेता न्यायालयाने हा आदेश दिला. अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरापासून हिंगणा एमआयडीसी व वाडीपर्यंत वन विभागाची सुमारे दोन हजार एकर जमीन आहे. या परिसरात नैसर्गिकरीत्या हजारो झाडे वाढली होती. तसेच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहीम सुरू केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येत वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, गेल्या मे महिन्यामध्ये मध्यरात्री या वनाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाने रात्री २ वाजता घटनास्थळी पोहचून पहाटे ५ वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले, पण तेव्हापर्यंत बराच विलंब झाला होता. दरम्यान,आगीमुळे हजारो झाडे जळून खाक झाली. याविषयी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. या प्रकरणावर आता १८ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

Web Title: Implement Ambazari Forest Protection Decisions