आयआयएम नागपूरचे केस रिसर्च सेंटर ठरेल देशासाठी ‘स्टोरी इंजिन’
By आनंद डेकाटे | Updated: November 17, 2025 20:25 IST2025-11-17T20:24:29+5:302025-11-17T20:25:28+5:30
कॅनडाच्या तज्ज्ञ व्हायोलेट्टा गॅलाघर : स्वतःचे केस रिसर्च केंद्र स्थापन करणारे नागपूर देशातील सर्वांत तरुण आयआयएम

IIM Nagpur's Case Research Center will become a 'story engine' for the country
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आय. आय. एम नागपूरने सुरू केलेले केस रिसर्च सेंटर हे भारतीय व्यवसायांचे अनुभव, त्यांचे संघर्ष आणि यशोगाथा यांना जागतिक स्तरावर पोचवणारे एक ‘स्टोरी इंजिन’ म्हणून कार्य करेल. यातूनच भारताच्या बिझनेस स्टोरीजचा अभ्यास जगभर केला जाईल,’ असे प्रतिपादन आयव्ही पब्लिशिंग या कॅनडामधील संस्थेच्या संचालिका व्हायोलेट्टा गॅलाघर यांनी केले.
आयव्ही ही व्यवस्थापन क्षेत्रात अभ्यासाकरिता केस स्टडी तयार करणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी संस्था आहे. या संस्थेच्या सहकार्यानेच भारतीय प्रबंध संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरने सोमवारी आपल्या केस रिसर्च सेंटर(सीआरसी)ची सुरुवात केली. भारतीय उद्योग, स्टार्टअप, सरकारी उपक्रम आणि सामाजिक संस्थांच्या वास्तव उदाहरणांवर आधारित केस स्टडी तयार करण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. यामुळे व्यवस्थापन शिक्षण अधिक भारतीय, अधिक व्यवहार्य आणि प्रत्यक्ष समस्यांशी जोडले जाणार आहे.
केंद्राच्या औपचारिक उद्घाटनानंतर आता आय. आय. एम. नागपूर हे असे स्वतंत्र केंद्र असलेले देशातील चौथे केवळ दहा वर्षांत असे केंद्र सुरू करणारे एकमेव असे संस्थान ठरले आहे. कार्यक्रमाला आय. आय. एम. नागपूरचे संचालक प्रा. भीमराया मेत्री, आयव्ही पब्लिकेशनचे असोसिएट डायरेक्टर अलेजांद्रो गार्सिया, केस रिसर्च सेंटरचे प्रमुख प्रा. राकेश गुप्ता, व्यासपीठावर उपस्थित होते.
केस रिसर्च सेंटरचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लाभ केवळ आय. आय. एम. नागपूरपुरते मर्यादित राहणार नाहीत. सुरुवातीला देशातील व्यवसाय शिक्षण देणाऱ्या नऊ प्रमुख संस्था या केंद्रासह ‘मेंबर बिझनेस स्कूल’ म्हणून जोडल्या गेल्या आहेत. या संस्थांना केंद्राच्या माध्यमातून आपल्या केस स्टडी तयार करण्याचे मार्गदर्शन आणि जागतिक स्तरावरील केस स्टडीजचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या नऊ संस्थांचे प्रतिनिधीही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यात अमृतवहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, संगमनेर,डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, नाशिक; फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्ली, आय. आय. एल. एम. लोधी रोड; आय. एम. आय. कोलकाता, आय. एम. एस. गाझियाबाद, लालबहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दिल्ली, पी. एम. एल. एस. डी बिझनेस स्कूल, चंदीगड, आणि संजीवनी विद्यापीठ, अहिल्यानगर यांचा समावेश होता.
प्रो. राकेश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. प्रो. यतीश जोशी यांनी आभार मानले.