नागपुरात आयएफसीसीआय इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:43 IST2018-10-30T22:41:11+5:302018-10-30T22:43:41+5:30
द इंडो-फ्रेंच चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या (आयएफआयआयसी) वतीने आणि फ्रान्स दूतावासाच्या सहकार्याने इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन २ नोव्हेंबरला वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये होणार आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत एच. ई. अॅलेक्झॅन्डर झिगलर यांच्या नेतृत्वात ११२ इंडो-फ्रान्स कंपन्यांचे उच्चस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती कॉन्क्लेव्हचे मुख्य संयोजक प्रसन्ना मोहिले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

नागपुरात आयएफसीसीआय इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : द इंडो-फ्रेंच चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या (आयएफआयआयसी) वतीने आणि फ्रान्स दूतावासाच्या सहकार्याने इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन २ नोव्हेंबरला वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये होणार आहे. भारतातीलफ्रान्सचे राजदूत एच. ई. अॅलेक्झॅन्डर झिगलर यांच्या नेतृत्वात ११२ इंडो-फ्रान्स कंपन्यांचे उच्चस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती कॉन्क्लेव्हचे मुख्य संयोजक प्रसन्ना मोहिले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आणि वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख उपस्थित होते.
मोहिले म्हणाले, स्मार्ट मोबिलिटी, लॉजिस्टिक, एरोस्पेस हे मुख्य मुद्दे आहेत. इंडो-फ्रान्सचे ११२ कंपन्यांचे ११२ प्रतिनिधी मिहानचा पूर्ण अभ्यास करून येत आहेत. सर्व प्रतिनिधी मिहानमधील पायाभूत सुविधांची पाहणी करणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात सामंजस्य करार होणार आहेत. समूह चर्चा आणि समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आयएफसीसीआयचे अध्यक्ष गुलयुमी जिरार्ड रेडेट प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. नागपूरसह विदर्भ गुंतवणुकीसाठी योग्य ठिकाण असल्याची जाणीव सर्व प्रतिनिधींना करून देण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मोबिलिटी, लॉजिस्टिक, एरोस्पेस व डिफेन्स या विषयांवर भारत सलोहोत्रा, स्टीफन्स लॅविग्ने, पॅट्रिक गिलार्ड, प्रमोद पुराणिक, ले. जनरल रवींद्र थोडगे, यूगो विन्सेंट, कॅ. राम अय्यर, वैभव व्होरा, संदीप चौधरी, उल्हास मोहिले मार्गदर्शन करणार आहेत.
मोहिले म्हणाले, विदर्भातील मुले-मुली उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुणे व इतरत्र जातात. नागपुरात चांगल्या कंपन्या आल्यास ही मुले बाहेर जाणार नाहीत. नागपूरसह विदर्भात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा, या उद्देशाने गेल्या दीड वर्षांपासून नागपुरात असा मोठा कार्यक्रम व्हावा आणि विदेशी कंपन्यांनी नागपुरात गुंतवणूक करावी, याकरिता वैयक्तिक पातळीवर आणि चेंबरशी वारंवार चर्चा करून प्रयत्न सुरू होते. त्याचे फळ मिळाले आहे. फडणवीस आणि गडकरी यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विश्वसनीयतेमुळे उद्योजक नागपुरात यायला तयार झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळेल, असा विश्वास उद्योजकांमध्ये निर्माण झाला आहे.