अधिक दराने मुद्रांक विकत असल्यास इथे करा थेट तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:09 IST2025-06-05T16:08:19+5:302025-06-05T16:09:00+5:30
Nagpur : मुद्रांक विभागाचे आवाहन

If you are selling stamps at an inflated price, file a complaint directly here.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दर्शनीय किमतीपेक्षा अधिक रक्कमेची मागणी मुद्रांक विक्रेते करत असल्यास त्याबाबत थेट तक्रार करण्याचे आवाहन मुद्रांक विभागाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
ही तक्रार सहजिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर शहर कार्यालय ए-विंग, ३ रा माळा, नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, सिव्हिल लाइन्स, नागपूर यांच्याकडे थेट सादर करावी. संबंधित मुद्रांक विक्रेता यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करता येईल तसेच मुद्रांक विक्री करताना होणाऱ्या गैरवर्तवणुकीला आळा घालणे शक्य होईल, असे मुद्रांक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
महसूल व वन विभाग यांच्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्याकरिता तसेच शासकीय कार्यालये, न्यायालये यांचेसमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. काही शासकीय कार्यालयांमध्ये मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत आग्रह धरतात. त्यामुळे शासकीय कार्यालयांनी सर्व सामान्य नागरिकांना मुद्रांकावर प्रतिज्ञापत्राची मागणी करून नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी (नागपूर शहर) संजय तरासे यांनी केले आहे.