भांडणे होत असतील तर कॅबीनेट घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका
By कमलेश वानखेडे | Updated: September 6, 2024 17:10 IST2024-09-06T17:05:37+5:302024-09-06T17:10:23+5:30
Nagpur : "महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल"

If there are quarrels, do not take the cabinet; Vijay Wadettiwar's scathing criticism
कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात आता भांडणे होऊ लागली आहेत. या भांडणांचा आवाज आता बाहेरही येऊ लागला आहे. असे असेल तर त्यांनी आता कॅबीनेट घेऊ नये, नाहीतर एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांना ठोकतील, असा खोचक सल्ला विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अलीकडील घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचे धिंढवडे निघाले आहेत. गुन्हेगाराची हिंमत वाढली आहे. राजकारणासाठी जीवन उद्धवस्त होत आहे. बदलापूरातील गोळीबार घटना त्याच प्रतीक आहे. बार्टी, आर्टीचे विदर्भात ट्रेनिंग सेंटर नाही. विदर्भातील मुलाना पुणे येथे जावे लागेल. याचे प्रशिक्षण केंद्र नागपुरात उघडले गेले पाहिजे. ही मागणी करणारे पत्र आपण सरकारला देऊ. गरज पडल्यास मी आंदोलन करणार, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. कमिशनखोर सरकारला घालविण्यासाठी आम्ही एकसंघ आहोत. महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा दावाही त्यांनी केला.