शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:44 AM2023-11-17T10:44:44+5:302023-11-17T10:45:45+5:30

पोकळ घोषणा नको; सरकारला उत्तर द्यावे लागेल

If farmers are not given funds, then will hold the government on edge in the session, warns Vijay Wadettiwar | शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

नागपूर : महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी ५० हजार रुपये देणार होते. तो निधी अद्याप मिळालेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. मंडळांची संख्या वाढवून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दुष्काळी स्थितीला मदत करण्याची गरज आहे. सरकारने तत्काळ मदत दिली नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात दिला.

वडेट्टीवार म्हणाले, सरकार हमी भावाची घोषणा करते. पण सोयाबीन, कापसाचे दर पडले आहेत. २०१३ मध्ये ११ हजार रुपयांना कापूस विकला जात होता. आता कुठे मिळतोय दर, सरकारला उत्तर द्यावे लागेल. खतांचे भाव वाढले आहेत. सरकारच्या पोकळ घोषणा सुरू आहेत. यावर्षी धानाचे पीक निघाले आहे. ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, अशी मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यावर घोषणा करणार का ? ऊस उत्पादकांच्या मागणीसाठी राजू शेट्टी लढत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा अधिवेशनात जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.

जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर

इंडिया आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. कुठल्या जागा कुणासाठी मेरिटवर सोडायची यावर चर्चा सुरू आहे. ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्यानंतर या चर्चेला गती येईल. डिसेंबर महिन्यात चित्र स्पष्ट होईल. इंडियाच्या जागावाटपात कुठलाही अडथळा येणार नाही, अशा दावाही त्यांनी केला.

प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. हा भाजपचा निवडणूक आयोग झाला आहे. राम मंदिर नि:शुल्क दाखवू म्हणणाऱ्यांना नोटीस का दिली नाही, असा सवाल करीत काँग्रेसला घाबरून यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Web Title: If farmers are not given funds, then will hold the government on edge in the session, warns Vijay Wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.