'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या' तरुणाने शरद पवारांना लिहिलेले हे पत्र लग्नसंस्थेविषयी कोणते वास्तव उघडे पाडते?
By राजेश शेगोकार | Updated: November 17, 2025 14:01 IST2025-11-17T14:00:07+5:302025-11-17T14:01:04+5:30
Nagpur : 'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या'... या समस्येचे समाधान फक्त सरकार, नेते किंवा धोरणे देऊ शकत नाहीत. यासाठी कुटुंबांची मानसिकता बदलावी लागेल. समाजाने नोकरी, वेतन, शहरात स्थायिकता यापलीकडे उपवरांकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. ग्रामीण युवकांची क्षमता, मेहनत, संस्कार आणि नैतिकता यांना विवाहाच्या समीकरणात पुन्हा स्थान मिळायला हवे.

'I am not getting married, please get me a wife' What truth does this letter written by a young man to Sharad Pawar reveal about the institution of marriage?
नागपूर : अकोल्यातील एका तरुणाने अलीकडे थेट शरद पवारांनाच 'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या' अशी विनंती केली, पण वरवर विनोदी वाटणाऱ्या या विनंतीमागची मोठी सामाजिक समस्या अंतर्मुख करणारी आहे. आज महाराष्ट्रात किंबहुना देशभरात हे एक नवीन सामाजिक वास्तव आकार घेत आहे. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असले, तरी समाजाच्या आत खोलवर एक वेदना धगधगत आहे. लग्नाळू तरुणांना जोडीदार मिळत नाही, ही एक मानसिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संक्रमणातून जन्मलेली सामाजिक वेदना आहे.
गेल्या दोन तीन दशकांत आपल्या समाजात विवाहाच्या निकषांमध्ये मोठे बदल झाले. शिक्षण वाढले, मुलींना संधी मिळाली, आर्थिक स्वावलंबन वाढले हे एक मोठे प्रगत पाऊल आहे. मात्र त्याच वेळी ग्रामीण आणि निमशहरी तरुणांना या बदलत्या वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक संधी, कौशल्य किंवा समर्थन उपलब्ध झालं नाही. परिणामतः, विवाहसंस्था हळूहळू समान सामाजिक संधींचा प्लॅटफॉर्म न राहता आर्थिक क्षमतेचा बाजार बनू लागली. हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.
खेड्यात किंवा अगदी लहानशा शहरात राहणारा, शेती करणारा, स्थिर नोकरी नसलेला किंवा कमी उत्पन्न गटामधील कुटुंबातील तरुणाला आता विवाहाच्या समीकरणात प्रथम पसंती मिळत नाही. मुलींच्या वाढत्या अपेक्षा चुकीच्या नाहीत, कारण त्या आयुष्याच्या सुरक्षिततेतून जन्मलेल्या आहेत. मात्र समाजाचा विकास समान गतीने न झाल्याने विवाह व्यवस्थेत असमानता निर्माण झाली आहे, याचे भान साऱ्यांच्याच हातातून सुटत चाललेले आहे. हा वैयक्तिक संकटाचा मुद्दा नाही; तर अनेक तरुणांच्या मनातील आक्रोश आहे. बोलताही येत नाही, फक्त शांतपणे घुसमट सहन करावी लागते. त्यामुळे अनेक तरुण आतून मोडले जात आहेत. त्यातून तरुणांची मानसिकताच बदलते.
अपूर्णता, अपयशाची भावना, भविष्याबद्दल भीती, सामाजिक दबाव आणि सर्वात म्हणजे एकाकीपणा... हा एकाकीपणा दिवसेंदिवस वाढतो आहे. पालकांच्या अपेक्षा, नातेवाइकांची चर्चा आणि समाजातील तुलना यांमुळे काही तरुण स्वतःवरचा विश्वास गमावत आहेत. काही व्यसनांकडे वळत आहेत, काही नैराश्याकडे. यावर केवळ चर्चा करून चालणार नाही. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाची मजबूत रचना, आर्थिक स्थैर्य ही या समस्येची किल्ली आहे. दुसरे, मानसिक आरोग्य आणि विवाहसंबंधी समुपदेशनाचे केंद्र गावोगाव स्थापन होणे आवश्यक आहे. सोबतच विवाहाच्या बाबतीत समाजाने केवळ वेतन आणि प्रतिष्ठा न पाहता स्वभाव, संस्कार आणि सहजीवनाची क्षमता मूल्य म्हणून स्वीकारली पाहिजे. आपल्याला या विषयावर उघड चर्चा सुरू करावी लागेल. ही वेदना समाजाने ऐकावी, समजून घ्यावी आणि उपाययोजना करावी, अन्यथा आपण अशी पिढी घडवू, जी जगेल... पण एकटीच !