"मी एकटी पडली आहे, मेक मी कम्पॅनिअन..", 'विकी डोनर' बनण्याच्या नादात कंत्राटदाराची लाजिरवाणी फसवणूक
By योगेश पांडे | Updated: November 10, 2025 17:54 IST2025-11-10T17:53:05+5:302025-11-10T17:54:58+5:30
Nagpur : सबकुछ ऑनलाइनच्या युगात अनेकांना वेळेत मूल न होणे या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर आंबटशौकिनांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचत आहे.

"I am lonely, make me a companion..", contractor's shameful deception in the name of becoming a 'Vicki donor'
नागपूर : एखाद्या तथाकथित महिलेच्या नावावर विविध प्लॅटफॉर्म्सवर 'मेक मी प्रेग्नंट' किंवा 'मेक मी कम्पॅनिअन' अशा पद्धतीच्या जाहिराती टाकत सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालवत आहेत. 'विकी डोनर' बनण्याच्या नादात या जाळ्यात विशेषतः तरुण व आंबटशौकिन फसत असून, बदनामी होण्याच्या भीतीपोटी अनेक जण तक्रार द्यायलादेखील समोर येत नसल्याचे वास्तव आहे.
पुण्यात एका मोठ्या कंत्राटदारासोबत घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीनंतर या रॅकेटची सायबर विश्वात चर्चा सुरू झाली. संबंधित कंत्राटदाराने ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून एका तथाकथित महिलेची 'मेक मी प्रेग्नंट' अशा पद्धतीची जाहिरात पाहिली होती. त्याने उत्सुकतेपोटी त्या संबंधित लिंकवर क्लिक केले व दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर त्याच्याशी तथाकथित महिलेने चॅटिंग सुरू केली. त्यानंतर व्हिडीओ कॉल सुरू झाले व मी एकटी पडली असून, मला मूल हवे आहे. मात्र, त्यासाठी तुझी मदत लागेल व तुझे शुक्राणू लागतील अशी तिने विनंती केली. तिच्या जाळ्यात अडकलेल्या कंत्राटदाराने तिच्यावर विश्वास ठेवला. त्याने प्रयोगशाळेसाठी शुक्राणू देण्याची तयारी दाखविली. मात्र, महिलेने त्याला 'इमोशनल' जाळ्यात ओढले. तिने अगोदर मेडिकल चाचणी, मग गोपनीयता करार, पडताळणी शुल्क, प्रक्रिया शुल्क इत्यादीच्या नावाखाली त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. बाळ झाल्यावर सर्व पैसे परत करेन, असे तिने त्याला सांगितले होते. कंत्राटदाराने महिलेने सांगितलेल्या खात्यांमध्ये ११ लाख रुपये पाठविले. मात्र, नंतर महिलेने संपर्क तोडला. कंत्राटदाराने चौकशी केली असता, अशी प्रयोगशाळा अस्तित्वातच नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले पण उशीर झाला होता. अशी अनेक प्रकरणे राज्यात घडली आहेत.