‘ती’ गेली मुलाच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला, ‘नवऱ्याने’ दिला मृत्यूचा अहेर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 20:09 IST2022-06-04T20:01:29+5:302022-06-04T20:09:48+5:30
Nagpur News वेगळे राहत असलेल्या पतीला मुलाच्या लग्नासाठी येण्याचा आग्रह करून त्याला निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या महिलेला पतीने तिची भावना समजून तर घेतली नाहीच, उलट धारदार शस्त्राने वार करून संपविले.

‘ती’ गेली मुलाच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला, ‘नवऱ्याने’ दिला मृत्यूचा अहेर !
नागपूर : वेगळे राहत असलेल्या पतीला मुलाच्या लग्नासाठी येण्याचा आग्रह करून त्याला निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या महिलेला पतीने तिची भावना समजून तर घेतली नाहीच, उलट धारदार शस्त्राने वार करून संपविले. ही धक्कादायक घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
छाया रामदास बोरीकर (५२, रा. कवडू पाटील आखाडाजवळ जुनी मंगळवारी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा पती रामदास बोरीकर (६०) हा पत्नीसोबत नेहमी वाद होत असल्यामुळे २०१७ पासून ढिवर मोहल्ला कन्याशाळेमागे येथे जुन्या घरी राहतो. तर छाया या सतीश (३२) आणि राकेश (२८) या आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जुनी मंगळवारीमध्ये सोबत राहतात. ९ जूनला सतीशचे लग्न आहे. वडिलांनी आता तरी आईवरचा राग सोडून लग्नासाठी घरी राहण्यासाठी यावे म्हणून तो बोलवायला गेला होता. परंतु वडिलांनी मी लग्नाला येणार नसल्याचे सांगून त्यास परत पाठविले होते. त्याने ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यावर छाया यांनी मी त्यांना समजावते, माझ्या समजावल्यानंतर ते नक्की घरी येतील आणि आपण सर्व जण मिळून आनंदाने लग्नकार्य पार पाडू, असे मुलाला सांगितले.
शनिवारी सकाळी ६.४५ वाजता छाया या दूध आणण्यासाठी गेल्या. तेथूनच त्या पतीला समजविण्यासाठी कन्याशाळेमागील जुन्या घरी गेल्या. मुलाच्या लग्नासाठी येण्याचे निमंत्रण दिले. मात्र त्यांच्यात आणि रामदासमध्ये वाद झाला. दरम्यान, पती रामदासने चाकूसारख्या शस्त्राने छायाच्या चेहऱ्यावर, पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार माहीत होताच त्यांचा मुलगा सतीशने धाव घेऊन आपल्या आईला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेले. परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सतीशने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
लग्नघरी शोककळा
अगदी पाच दिवसांवर लग्न आले असल्याने घरी तयारी सुरू होती. लग्नाचे सर्व नियोजनही झाले होते. खरेदीही सुरू होती. मात्र ही दुर्दैवी घटना घडली. आपले वडील असे काही करतील याची मुलांना ध्यानीमनीही कल्पना नव्हती. यामुळे लग्नघरचे वातावरण एका क्षणात बदलून शोककळा पसरली.
...