सीमा ओलांडणारी माणुसकी ! मानसिक स्थिती खालावलेल्या ३४ वर्षीय महिलेचे केले आंतरराज्यीय पुनर्वसन
By सुमेध वाघमार | Updated: December 6, 2025 16:09 IST2025-12-06T16:08:08+5:302025-12-06T16:09:04+5:30
Nagpur : प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झालेल्या ३४ वर्षीय अनोळखी महिलेची ओळख हरवलेली, आठवणी तुटलेल्या आणि मानसिक स्थितीही खालावलेली होती.

Humanity that crosses borders! Interstate rehabilitation of a 34-year-old woman with a deteriorating mental condition
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झालेल्या ३४ वर्षीय अनोळखी महिलेची ओळख हरवलेली, आठवणी तुटलेल्या आणि मानसिक स्थितीही खालावलेली होती. मात्र उपचार, समुपदेशन आणि सततच्या काळजीमुळे ती हळूहळू सुधारू लागली. तिचं कुटुंब शोधण्याचे प्रयत्न झाले, पण तिच्या आठवणी आणि भाषेच्या अडचणींमुळे ते शक्य झालं नाही. अखेर तिच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला आणि राज्यांच्या सीमा ओलांडत नागपूरहून तेलंगाण्यात तिचे पहिले आंतरराज्यीय पुनर्वसन करण्यात आले. या संपूर्ण प्रवासाने पुन्हा एकदा माणुसकीचे खरे मूल्य दाखवून दिले.
भंडारा पोलिसांनी २७ डिसेंबर २०१९ रोजी अनोळखी आशादेवीला (नाव बदलेले) नागपूरच्या प्रियदर्शिनी महिला वसतिगृहात दाखल केले होते. तिची मानसिक स्थिती बिघडल्याने ११ मार्च २०२४ रोजी तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे यांच्या नेतृत्वाखालील टीमने केलेल्या सततच्या उपचारामुळे आशादेवीची मानसिक स्थिती हळूहळू सुधारत गेली आणि स्थिर झाली. परंतु, तिच्या कुटुंबाचा शोध घेणे हे समाजसेवा अधीक्षक कुंदा बिडकर काटेखाये यांच्यासाठी मोठे आव्हान होते. काटेखाये यांनी सांगितले, आशादेवीकडून बोलण्यातून तुटक माहिती मिळाली, पण तिची भाषेची समस्या मोठी होती. विजयवाडा पोलीस स्टेशन, स्थानिक पोलीस, सरपंच अशा अनेक ठिकाणी संपर्क साधूनही नातेवाईकांचा ठोस मागोवा लागला नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी खम्मम, तेलंगणा येथील डॉ. अन्नम सेवा फाउंडेशनचे संचालक अण्णम श्रीनिवास राव यांच्याशी संपर्क साधला. आशादेवीचे पुनर्वसन डॉ. अन्नम सेवा फाऊंडेशनमध्ये झाले तर मातृभाषेत संवाद होईल आणि कुटुंबाचा शोधही सोपा होईल अशी माहिती देण्यात आली. श्रीनिवास राव यांनी क्षणार्धात मदतीची तयारी दर्शवली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुमणे यांनी तात्काळ संमती दिली, तर मनोविकार तज्ज्ञ डॉ. पंकज बागडे यांनी मानसिक आरोग्य कायद्यानुसार संस्थेमध्ये पुनर्वसित करण्यासाठी अधिकृत संमती दिली.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण, सुरक्षित हस्तांतरण
मानसिक आरोग्य आढावा मंडळ नागपूरचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार, ५ डिसेंबर २०२५ रोजी सर्व कायदेशीर पत्रव्यवहार पूर्ण करून रुग्णाला तेलंगणा येथील संस्थेकडे सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचारी नीलिमा ठाकरे आणि वैशाली काळे यांनी तिला सोबत नेले.
रुग्णाचे कल्याण हे आमचे कर्तव्य
रुग्ण मातृभाषिक वातावरणात जात असल्यामुळे तिचा पुढील प्रवास अधिक सकारात्मक राहील, असा विश्वास आहे. रुग्णाचे कल्याण, सुरक्षितता आणि त्याच्या भविष्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.
"हा महत्त्वाकांक्षी टप्पा गाठल्यामुळे आशादेवीला तिच्या मातृभाषेतून संवाद साधण्याची आणि तिच्या कुटुंबाशी पुन्हा जोडली जाण्याची नवी आशा मिळाली आहे."
-डॉ. सतीश हुमणे, वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर