नागपुरात १३ दिवसांत सोने, चांदीच्या भावात प्रचंड मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 20:46 IST2025-10-28T20:44:43+5:302025-10-28T20:46:06+5:30
Nagpur : सध्या दर खाली आले असले तरी ही स्थिती तात्पुरती असण्याची शक्यता सराफा विश्लेषकांनी व्यक्त केली. सोने आणि चांदी हे नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय मानले जातात.

Huge fall in gold and silver prices in Nagpur in 13 days; investors excited
नागपूर : नागपूरच्या सराफा बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या भावात झालेली प्रचंड घसरण गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरली आहे. मंगळवार, २८ ऑक्टोबरला एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार, तर किलो चांदीत ५ हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे जीएसटीसह २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर १,२२,७०० आणि चांदीचा किलो दर १,४९,३५० इतका झाला.
पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता
१५ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर १,३१,४०० होता, तो केवळ १३ दिवसांत ८,७०० रुपयांनी घसरून ३ टक्के जीएसटीसह १,२२,७०० पर्यंत उतरला. त्याचप्रमाणे चांदीचा किलो दर १,८९,००५ वरून १,४९,३५० रुपयांवर घसरला. म्हणजेच तब्बल ३९,६५५ रुपयांची पडझड झाली. या झपाट्याने होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये स्पष्टपणे अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय
सध्या दर खाली आले असले तरी ही स्थिती तात्पुरती असण्याची शक्यता सराफा विश्लेषकांनी व्यक्त केली. सोने आणि चांदी हे नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय मानले जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईत विक्री किंवा मोठे निर्णय घेऊ नयेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. दर घसरल्यामुळे अनेक ग्राहक आता बाजाराकडे वळतील, असा अंदाजही व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी, सोने-चांदीच्या जागतिक मागणीत घट, गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे वाढता कल, या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
सोने-चांदीच्या भावात घसरण :
दिनांक सोन्याचे भाव चांदीचे भाव
१५ ऑक्टो. १,३१,४०० १,८९,००५
२० ऑक्टो. १,३३,४०० १,७३,०४०
२५ ऑक्टो. १,२७,१०० १,५६,८००
२७ ऑक्टो. १,२५,७०० १,५४,३००
२८ ऑक्टो. १,२२,७०० १,४९,३५०
(भाव ३ टक्के जीएसटीसह)