बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी दाम्पत्याने घेतले विष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 21:30 IST2025-09-14T21:29:08+5:302025-09-14T21:30:01+5:30
नरखेड येथील धक्कादायक घटना : पतीचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी दाम्पत्याने घेतले विष
नागपूर (नरखेड) : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने राहत्या घरी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
अल्पभूधारक शेतकरी नामदेव संतोष बरडे (७०) व त्यांची पत्नी लता नामदेव बरडे (६२), रा. कुंभारपेठ, वॉर्ड क्रमांक १२, नरखेड यांनी रविवारी (दि.१४) दुपारी राहत्या घरी मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक प्राशन केले. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने दोघांनाही नरखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती नामदेव बरडे यांना मृत घोषित केले, तर लता बरडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.
ब्राह्मणी शिवारात दीड एकर शेती असलेल्या नामदेव बरडे यांचे उत्पन्न अल्प असल्यामुळे गुजराण करणे कठीण झाले होते. त्यातच शेतीतून पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने पत्नी लता या दुसऱ्याच्या शेतात मजुरी करीत होत्या. रविवारी सकाळी ११ वाजता पिकांची पाहणी करून दोघे घरी परतले असता अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बँकेचे कर्ज, बचत गटाचे कर्ज तसेच हातउसने घेतलेले पैसे फेडणे अशक्य असल्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत त्यांचा पुतण्या सुरेंद्र बरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून तपास हवालदार मनोज गाढवे करीत आहेत.