‘पदवीधर’च्या निवडणूकीसाठी वर्षभराअगोदर भाजपने कसली कंबर
By योगेश पांडे | Updated: September 5, 2025 23:41 IST2025-09-05T23:40:51+5:302025-09-05T23:41:10+5:30
मतदार नोंदणी प्रमुखपदाची सुधाकर कोहळेंकडे जबाबदारी : २०२० मधील मतांची वजाबाकी यंदा बेरजेत बदलण्याचे आव्हान

‘पदवीधर’च्या निवडणूकीसाठी वर्षभराअगोदर भाजपने कसली कंबर
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात मागील वेळी पक्षाला मोठा धक्का बसला होता. २०२० च्या निवडणूकीत तोंड पोळल्यावर पक्षाने आता यासंदर्भात ताकदेखील फुंकून पिण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच निवडणूकीला वर्षभराहून अधिकचा कालावधी असतानादेखील पक्षाने त्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
भाजपकडून शुक्रवारी तीन पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रमुखांची घोषणा झाली. त्यात नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी प्रमुखपदी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकेकाळी गणिताचे शिक्षक असलेल्या कोहळेंना मतदार नोंदणीत उतरवून पक्षाकडून मागील वेळची मतांची वजाबाकी बेरजेत बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघात २०२० मध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड.अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव केला होता. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. हा मतदारसंघ तयार झाल्यापासून इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार याठिकाणी निवडून गेला नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील एकेकाळी याच मतदारसंघातून विधानपरिषदेत निवडून गेले होते. मात्र २०२० मध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित येत भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. त्यामुळे भाजपकडून यावेळी अगोदरच तयारीवर भर देण्यात येत आहे. वंजारी यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व ६ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. त्याच कालावधीत निवडणूक होईल. या निवडणूकीत पदवीधर मतदारसंघ बांधणे व नवीन मतदारांसोबत जुन्या मतदारांची नोंदणी यावर पूर्ण गणित अवलंबून असते. हीच बाब लक्षात ठेवून भाजपकडून यंदा अगोदरच पावले उचलण्यात येत आहे.
मतदार बांधणे जास्त महत्त्वाचे
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदारांची नोंदणी मोठी भूमिका पार पाडत असते. ही प्रक्रिया भाजपकडून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठांमध्येदेखील जोर लावण्यात येईल. २०२० च्या निवडणूकीची ॲड.वंजारी यांनी अगोदरपासूनच तयारी सुरू केली होती व त्याचा त्यांना फायदा झाला होता. नागपूर विद्यापीठाच्या वर्तुळात ते सक्रियदेखील होते. माजी आमदार कोहळे यांच्याकडे नागपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. एकेकाळी कोहळे हे शिक्षक होते व पदवीधरमधील संघटन बांधणीची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांचा नियोजन कौशल्याचा कस लागणार आहे