शेतकऱ्यांनी 'सीसीआय'ला कापूस विकायचा कसा? 'ह्या' अँपवर करा नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:03 IST2025-09-16T17:01:30+5:302025-09-16T17:03:47+5:30
रामटेक तालुक्यात खरेदी केंद्राचा अभाव : कपास किसान अॅपवर नोंदणीबाबत अनभिज्ञ

How can farmers sell cotton to CCI? Register on this app
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : खुल्या बाजारात कापसाचे दर कमी असल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना 'सीसीआय'ला 'एमएसपी' दराने कापूस विकण्यावाचून गत्यंतर नाही. सीसीआयला कापूस विकण्यासाठी आधी त्यांच्या कपास किसान या अॅपवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शेतकरी या नोंदणीबाबत अनभिज्ञ असून, सीसीआयने रामटेक तालुक्यात अद्याप एकही कापूस खरेदी केंद्र मंजूर केले नाही. त्यामुळे रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विकायचा कसा? हा प्रश्न उपस्थित झाला असून, यावर कुणीही बोलायला तयार नाही.
धानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रामटेक तालुक्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढत आहे. यावर्षी तालुक्यात किमान चार हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड करण्यात आली. हेक्टरी २५ क्विंटल कापसाचे उत्पादन विचारात घेतले तरी या तालुक्यात किमान एक लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. मागील तीन वर्षांत कापसाचे दर एमएसपीच्या वर किंवा आसपास राहिल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस पटगोवरी व आमडी येथे असलेल्या दोन जिनिंगमध्ये नेऊन विकला. यावर्षी कापसाचे दर आधीच दबावात आहेत. त्यातच केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क दि. ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्याने कापसाची आयात वाढली आणि कापसाचे दर प्रतिक्विंटल सात हजार रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता आजच मावळली आहे.
केंद्र सरकारने चालू हंगामासाठी कापसाची एमएसपी प्रतिक्विंटल ८,११० रुपये जाहीर केली आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर सात हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास शेतकऱ्यांना किमान प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी त्यांना कापूस सीसीआयला विकणे आणि त्यासाठी सीसीआयच्या विशिष्ट अॅपवर आधी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांना स्वतः करायची असून, त्यासाठी आधी ई-पीक पाहणी करून त्याची सातबारावर नोंद असणे अनिवार्य आहे. मात्र, शेतकरी याबाबींपासून अनभिज्ञ असल्याने तसेच त्यांना कुणीही वेळीच योग्य मार्गदर्शन करीत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनो, अशी करा नोंदणी !
शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोरमधून सीसीआयचे कपास किसान अॅप डाऊनलोड करून त्यावर स्वतःच नोंदणी करायची आहे. कपास किसान अॅपवर आपला जो मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाला जोडला आहे, तो त्यात टाकून त्यावर ओटीपी मागा आणि ओटीपी टाकून अॅप ओपन करा. त्यातील पहिल्या फार्मर नामक हिख्या पट्टीवर क्लिक करून आत प्रवेश केल्यानंतर पहिला रकाना सोडून उर्वरित रकान्यात विचारलेली माहिती व्यवस्थित भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यावर शेतकऱ्याचे आधार कार्ड व पासपोर्ट फोटो विशिष्ट आकारात अपलोड करायचे आहे आणि नंतर ई-पीक पाहणी नमूद असलेल्या सातबाराचे पीडीएफ अपलोड करून सबमिट करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफूल व बारकोड असा मॅसेज प्राप्त होतो.
अंतिम मुदत ३० सप्टेंबर
सीसीआयला कापूस विकण्यासाठी करावयाच्या नोंदणीची अंतिम मुदत दि. ३० सप्टेंबर आहे. ही नोंदणी १ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, त्याची घोषणा ऑगस्टमध्ये करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी १४ सप्टेंबरपर्यंत करायची होती. याला दि. २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर सहायक स्तरावरील ई-पीक पाहणीला सुरुवात होईल. त्यामुळे या काळात नोंदणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कापसाचे पीक असलेल्या शेताची ई-पीक पाहणी तातडीने करून घ्यावी. ई-पीक पाहणी यशस्वीरीत्या करताच त्याची ४८ तासांमध्ये आपोआप सातबारावर नोंद होते आणि हा सातबारा नोंदणी वापरायचा आहे.
"रामटेक तालुक्यात सीसीआयच्या नोंदणीला शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. नोंदणी करताना शेतकऱ्यांना विक्री केंद्र निवडावे लागते. त्यामुळे किती शेतकऱ्यांना नोंदणी केली, याची माहिती कळत असल्याने सीसीआय तालुक्यात एखाद्या जिनिंगमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत विचार करेल. कापूस खरेदी केंद्र मिळविण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करणे अत्यावश्यक आहे."
- हनुमंता महाजन, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रामटेक