गडचिरोलीत अपघातांचे भयावह चित्र ! ७५ महिन्यांत ८६५ अपघात, १०६४ मृत्यू, ४४३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:33 IST2025-04-17T14:32:56+5:302025-04-17T14:33:38+5:30
Nagpur : हायकोर्टात गडचिरोली जिल्ह्यातील आकडेवारी

Horrifying picture of accidents in Gadchiroli! 865 accidents, 1064 deaths, 443 injuries in 75 months
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध कारणांमुळे गेल्या ७५ महिन्यांत ८६५ अपघात झाले. त्यात १ हजार ६४ जणांचा मृत्यू झाला, तर ४४३ जण जखमी झाले. गडचिरोली पोलिस अधीक्षकांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.
यासंदर्भात आष्टी येथील रहिवासी नितीश पोद्दार यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रतिज्ञापत्रानुसार, यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ३३ अपघात झाले. त्यात ३६ जणांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील रोडची योग्य देखभाल केली जात नाही. जड वाहतुकीमुळे अनेक रोड खराब झाले आहेत. परिणामी, अपघात होत आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०१९ १३६ १५७ १२४
२०२० १३५ १९५ ७१
२०२१ १२६ १४३ ८६
२०२२ १४६ २१० ५८
२०२३ १४३ १६६ ७४
२०२४ १४६ १५७ ३०