राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे गृहमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ट्रान्झिट कॅम्पसचेसुद्धा ई-अनावरण
By योगेश पांडे | Updated: May 26, 2025 20:21 IST2025-05-26T20:21:20+5:302025-05-26T20:21:41+5:30
वेदमंत्रांच्या उच्चारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर ट्रान्झिट कॅम्पसचे ई-अनावरण झाले. गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे गृहमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ट्रान्झिट कॅम्पसचेसुद्धा ई-अनावरण
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’च्या (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) कायमस्वरूपी कॅम्पसचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी तात्पुरत्या कॅम्पसचेदेखील ई-अनावरणदेखील झाले. सोमवारी कामठी तालुक्यातील चिचोली येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशीष देशमुख, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, ‘एनएफएसयू’चे कुलगुरू डॉ. जे. एम. व्यास प्रामुख्याने उपस्थित होते. एनसीआयचा कार्यक्रम झाल्यावर गृहमंत्री शाह यांचे हेलिकॉप्टरने दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास चिचोली येथे आगमन झाले. वेदमंत्रांच्या उच्चारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर ट्रान्झिट कॅम्पसचे ई-अनावरण झाले. गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.
‘एनएफएसयू’हे जगातील पहिले आणि एकमेव फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ आहे. नागपुरात ‘एनएफएसयू’चे अकरावे कॅम्पस राहणार आहे. गुजरात, नवी दिल्ली, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, मणिपूर, पुणे आणि परदेशात युगांडामध्ये येथे विद्यापीठ कार्यरत आहे. महाराष्ट्रात एनएफएसयूच्या नवीन कॅम्पसच्या स्थापनेमुळे कुशल फॉरेन्सिक तज्ज्ञ घडतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
गुन्ह्यांच्या वैज्ञानिक विश्लेषणाला मिळेल बळ
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना फॉरेन्सिक सायन्सच्या वैज्ञानिक वापराद्वारे गुन्हे रोखण्यास, कमी करण्यास आणि शोधण्यास मदत मिळेल. तसेच विविध यंत्रणांची फॉरेन्सिक क्षमतादेखील वाढेल. नागपुरातील कॅम्पसमुळे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित विविध समस्या सोडवण्यास मदत होईल. यामुळे न्यायदान प्रणालीला वेग मिळेल. एनएफएसयूमध्ये २०२५-२६ पासून फॉरेन्सिक व सायबर सुरक्षेशी संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू होतील. त्यात एमएसस्सी (फॉरेन्सिक), एमएसस्सी (सायबर सिक्युरिटी), बीबीए, एमबीए या अभ्यासक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे.