पाश्चात्य प्रभावाच्या इतिहासकारांनी भारतीय ज्ञान परंपरा कलुशित केली

By निशांत वानखेडे | Updated: February 28, 2025 18:03 IST2025-02-28T18:02:22+5:302025-02-28T18:03:14+5:30

जेएनयुच्या कुलगुरू शांतीश्री पंडित : व्हीएनआयटीमध्ये ‘भारतीय ज्ञान प्रणाली’वर परिषद सुरू

Historians of western influence corrupted the Indian knowledge tradition | पाश्चात्य प्रभावाच्या इतिहासकारांनी भारतीय ज्ञान परंपरा कलुशित केली

Historians of western influence corrupted the Indian knowledge tradition

नागपूर : आध्यात्माची जाेड असलेली भारतीय ज्ञान परंपरा व सभ्यता जगात सर्वश्रेष्ठ आहे. मात्र आक्रमणकारी माेघलांनी व नंतर ब्रिटीशांनी आपला समृद्ध असा इतिहास झाकून ज्ञान विज्ञानाची माेडताेड केली व पुढे असभ्य म्हणून प्रचारीत केले. दुर्देवाने स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षात पाश्चात्य प्रभावित राजसत्तेच्या प्रभावाखाली असलेल्या इतिहासकारांनीही या ज्ञान परंपरेला कलुशितच केले, अशी टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीच्या कुलगुरू डाॅ. शांतिश्री धुलीपूडी पंडित यांनी केली.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) च्यावतीने आयाेजित ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ विषयावरील दाेन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या बाेर्ड ऑफ गव्हर्नन्सचे चेअरमन माडाभूषी मदन गाेपाल, संचालक प्रा. प्रेम लाल पटेल प्रामुख्याने उपस्थित हाेते. डाॅ. शांतिश्री पंडित यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रभावातील राजसत्तेत भारतीय इतिहसाचे सत्य मांडणाऱ्या आर.सी. मजुमदार यांच्यासारख्या इतिहासकारांना बाजुला सारण्यात आल्याची टीका केली. त्याऐवजी असत्याचा प्रचार करणाऱ्या पाश्चात्य प्रभावातील इतिहासकारांना पुढे आणण्यात आले. त्यांनी आपल्या प्रचारतंत्राने भारतीय वारसा निम्न लेखून आक्रमणकारी शक्तिंच्या धर्म संस्कृतीला चमकविण्याचे काम केले. भारताचा समृद्ध इतिहास झाकण्यात आला.

या इतिहासकारांनी पुढे भारतीय असंस्कृत व असभ्य असल्याचाच प्रचार केला. माेघलांमुळे संस्कृती आली व ब्रिटीशांमुळे सभ्यता आणि लाेकशाही मिळाली, असा बनावट प्रचार करण्यात आला. आर्य बाहेरून आले व ब्राम्हणांवर समाजात दुफळी निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार, नायजेरियामध्येही ब्रिटीशांचे राज्य हाेते, मग तिथे लाेकशाही का रुजली नाही, असा सवाल त्यांनी केला. वास्तविकतेत भारतात १०,००० वर्षापासून सभ्यता असल्याचे कार्बन डेटिंगवरून आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला नाही, तर भारताने त्यांना लाेकशाही व सभ्यता शिकविली, असे मत डाॅ. पंडित यांनी व्यक्त केले.

औरंगजेबाचे गाेडवे, संभाजी महाराज झाकले
इतिहासकारांनी कायमच आक्रमणकारींचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न केला. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना क्रुरपणे मारले, त्या औरंगजेबाचे धर्मनिरपेक्ष, दयाळू म्हणून इतिहासात वर्णन करण्यात आले आणि संभाजी महाराजांना इतिहासातूनच गायब करण्यात आल्याची टीका डाॅ. पंडित यांनी केली. भारताच समृद्ध वारसाच इतिहासातून गाळण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

स्त्रिवाद आम्हाला शिकवू नये
सरस्वती, महालक्ष्मी, दुर्गा, पार्वती या स्त्री देवतांना भारतीय पूजत आले आहेत. स्वत: भगवान शंकरांना अर्धनारीश्वर मानले जाते. लक्ष्मीपती, सीतापती, उमापती, राधाकृष्ण असा पुरुष देवतांचा उल्लेख पत्नीच्या नावाने हाेताे. त्यामुळे पाश्चात्यांनी आम्हाला स्त्रीवाद शिकवू नये, असे डाॅ. पंडित म्हणाल्या. 

ख्रिश्चन, मुस्लिमांप्रमाणे हिंदू एका देवावर अवलंबून नाहीत
ख्रिश्चन, मुस्लिम एकाच देवावर अवलंबून आहेत. त्यांच्याकडे एकच पर्याय आहे. हिंदूकडे ईश्वराचे अनेक पर्याय आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. भारत सर्वसमावेशकता व विविधता साजरा करणारा देश आहे. आमचा धर्म हा कर्मकांड नाही तर जगण्याचा मार्ग आहे, म्हणून आमच्यात लाेकशाही मजबूत आहे, असे मतही त्यांनी मांडले.

ज्ञान, तंत्रज्ञानातही श्रेष्ठ
जगात कुठेही नव्हते तेव्हा ब्रहधिश्वरा मंदिर, मीनाक्षी मंदिर आदी मंदिरांचे आर्किटेक्ट भारताकडे हाेते. ताजमहाल आश्चर्य नाही तर ही मंदिरे आश्चर्य व सर्वश्रेष्ठ आर्किटेक्टचा नमुना आहेत. आमच्याकडे धातुंचे, अधातुंचे ज्ञान हाेते, चुंबकीय शक्तिची माहिती हाेती. आर्यभट्ट, भास्कराचार्य, रामानुजमसारखे श्रेष्ठ गणितज्ज्ञ, खगाेलतज्ज्ञ, शंकराचार्यासारखे तत्वज्ञ व सुश्रुतासारखे शस्त्रक्रियेचे ज्ञान असलेले वैद्यकीय तज्ज्ञही हाेते. संस्कृत वेद, उपनिषदात हे ज्ञान आजही शाबूत आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या शिक्षकांनी हे ज्ञान विविध भारतीय भाषांमध्ये आणावे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, असे आवाहन डाॅ. शांतिश्री पंडित यांनी केले.

Web Title: Historians of western influence corrupted the Indian knowledge tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर