हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:00 PM2020-07-28T22:00:19+5:302020-07-28T22:01:31+5:30

गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली.

High Court: Doctor slapped for filing poor quality petition | हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले

हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले

Next
ठळक मुद्देमहान व्यवसाय असल्याने दावा खर्च बसवला नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली.
डॉ. जैन यांना कायद्यातील तरतुदींची माहिती होती. असे असताना त्यांनी केवळ नशीब अजमावण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रयत्नाची कधीच प्रशंसा केली जाऊ शकत नाही. या याचिकेमुळे न्यायालयाचा वेळ व्यर्थ गेला. परंतु, डॉ. जैन हे महान व्यवसायाशी जुळलेले असल्यामुळे त्यांच्यावर दावा खर्च बसवणे टाळत आहोत. त्यांनी यातून धडा घेऊन भविष्यात कायद्याचा उचित सन्मान करावा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व नितीन सूर्यवंशी यांनी या प्रकरणावर निर्णय दिला.
डॉ. जैन यांनी धरमपेठ येथील एका इमारतीच्या तळमाळ्यावर दंत रुग्णालय सुरू केले होते. त्यामुळे त्या जागेचा उपयोग बदलला गेला. परिणामी, महानगरपालिकेने त्यांना १ फेब्रुवारी २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीसला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या दंत रुग्णालयाला ९ मार्च २०२० रोजी परवानगी दिली आहे. त्यामुळे वादग्रस्त नोटीस अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने त्यावर उत्तर सादर करून आरोग्य अधिकाऱ्याला उपयोग बदलाची परवानगी देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच, डॉ. जैन यांनी संबंधित जागेचा उपयोग बदलण्याची परवानगी मिळविण्यासाठी ९ मार्च रोजी सादर केलेला अर्ज १९ मार्च रोजी फेटाळण्यात आल्याची माहिती दिली. उच्च न्यायालयाने हे मुद्दे लक्षात घेता याचिका गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court: Doctor slapped for filing poor quality petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.