Nagpur Rain: नागपुरात कोसळधार! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा, शाळांना सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 11:46 IST2023-09-23T09:00:34+5:302023-09-23T11:46:48+5:30
शहरातील महावितरणचे शंकर नगर आणि इतरही अनेक सब स्टेशन आणि वीज यंत्रणा पाण्यात गेली आहे.

Nagpur Rain: नागपुरात कोसळधार! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा, शाळांना सुट्टी जाहीर
नागपूर - शुक्रवार मध्यरात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने शहरात हाहाकार उडाला. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रस्ते, वस्त्या जलमय झाल्या. काही ठिकाणी विजांमुळे सेट टॉप बॉक्स टीव्हीच्या आयसी उडाल्या.
शहरातील महावितरणचे शंकर नगर आणि इतरही अनेक सब स्टेशन आणि वीज यंत्रणा पाण्यात गेली आहे. तर अनेक वस्तीमध्ये पाणी शिरल्याने महावितरणला रात्री २ पासूनच शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद करावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझिम अद्याप सुरूच आहे.
शाळांना सुट्टी जाहीर-
नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना ( जिल्हा व महानगर क्षेत्र ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सखल भागाची पाहणी केली. तसेच बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधला.