नागपुरात उष्णतेचा कहर ! दुपारी कोचिंग क्लासेसवर बंदी, कामगारांनाही ११ ते ४ विश्रांतीचे आदेश
By आनंद डेकाटे | Updated: May 16, 2026 15:46 IST2026-05-16T15:44:45+5:302026-05-16T15:46:04+5:30
Nagpur : जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी व्यापक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत.

Heat wreaks havoc in Nagpur! Coaching classes banned in the afternoon, workers ordered to rest from 11 to 4
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी व्यापक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार, सर्व कोचिंग क्लासेसना सकाळ आणि सायंकाळच्या सत्रातच वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले असून दुपारी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी क्लासेसमध्ये मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासह उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा आणि वर्ग टाळावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. पूर्वनियोजित परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांसाठी थंड पिण्याचे पाणी, ओआरएस आणि परीक्षा हॉल थंड ठेवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. उद्योग, कारखाने, खाणी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीही विशेष निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी ११ ते ४ या वेळेत कामगारांना विश्रांती देण्यात यावी आणि उघड्यावर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. काम सुरू ठेवणे आवश्यक असल्यास सावलीसाठी शेड, थंड पाण्याची व्यवस्था आणि ओआरएस उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थी वसतिगृहांमध्ये थंड पिण्याचे पाणी, आयव्ही, ओआरएस आणि कुलपॅकची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून दुपारच्या वेळी वसतिगृह थंड राहतील यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना उष्माघाताच्या रुग्णांसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्ड वॉर्ड तयार ठेवणे, आवश्यक औषधसाठा, आयव्ही, ओआरएस आणि कुलपॅक उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघातग्रस्त रुग्णांची दैनंदिन नोंद ठेवण्याची जबाबदारीही रुग्णालयांवर सोपविण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांना या उपाययोजनांसाठी नोडल अधिकारी घोषित करण्यात आले असून त्यांनी शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व विभाग, यंत्रणा, अधिकारी आणि आस्थापनांनी आदेशातील निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.