ह्रदयद्रावक... कोविड सेंटरमधून तो पळाला, 35 वर्षीय युवकाचा सकाळी मृतदेहच मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 20:43 IST2021-04-17T20:42:56+5:302021-04-17T20:43:27+5:30
उमरेड येथील हृदय हेलावून टाकणारी घटना

ह्रदयद्रावक... कोविड सेंटरमधून तो पळाला, 35 वर्षीय युवकाचा सकाळी मृतदेहच मिळाला
नागपूर (उमरेड) : कोविड सेंटरमध्ये नजरेसमोरच दोन जणांचा जीव गेला. या धक्यातून तो स्वत:ला सावरु शकलाच नाही. रात्री उशीरा आॅक्सीजन काढल्यानंतर आरोग्य यंत्रनेला हुलकावणी देत त्याने पळ काढला. त्यामुळे, सर्वत्र खळबळ उडाली, शोधकार्यासाठी धावपळ सुरु झाली. पोलीस ठाण्यात याबाबत सूचनाही देण्यात आली. अखेरीस सकाळी ‘त्या’ रुग्णाचे प्रेतच रस्त्यावर आढळून आले. उमरेड येथील या घटनेमुळे समाजमन सून्न झाले आहे. राजेश बाबुराव नान्हे (३५, रेवतकर ले आऊट, उमरेड) असे मृताचे नाव आहे.
राजेश नान्हे खासगी चारचाकी वाहने किरायाने देण्याचा व्यवसाय करीत होता. अचानक तो कोरोनाबाधित झाला. त्याला १४ एप्रिल रोजी उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री तो कोविड सेंटरमधून पळाला. सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. अखेरीस नगर परिषद इतवारी प्राथमिक शाळेलगत तो मृतावस्थेत आढळून आला. नगर पालिका कर्मचारी आणि कुटूंबातील काही सदस्यांनी योग्य खबरदारी घेत त्याचा अंत्यविधी पार पाडला. राजेश पश्चात पत्नी, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. तो कर्ता असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबियांना धक्का बसला आहे.
सुरक्षित बॉडी कीटची कमतरता
शनिवारी सकाळच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंत्यविधी उरकविण्यासाठी सुरक्षित बॉडी कीटच उपलब्ध नव्हती. ग्रामीण रुग्णालयाचा थातूरमातूर आणि बोलबच्चन कारभार पुन्हा एकदा या घटनेमुळे चव्हाट्यावर आला. त्यानंतर लागलीच नगर पालिकेने शनिवारी तातडीने ४० सुरक्षित बॉडी कीट बोलाविल्या आणि अंत्यविधी पार पाडले.