कळमना स्टेशनवर घडली हृदयस्पर्शी घटना – आरपीएफच्या तत्परतेने झाली आई–मुलाची पुनर्भेट

By नरेश डोंगरे | Updated: June 16, 2025 19:50 IST2025-06-16T19:49:34+5:302025-06-16T19:50:33+5:30

हातात पाण्याची बाटली अन् डोळ्यात गंगाजमूना : अहमदाबाद सुपरफास्टमध्ये 'रामपूर का लक्ष्मण'

Heart-touching incident at Kalamana station : Mother-son reunion with RPF's promptness | कळमना स्टेशनवर घडली हृदयस्पर्शी घटना – आरपीएफच्या तत्परतेने झाली आई–मुलाची पुनर्भेट

Heart-touching incident at Kalamana station : Mother-son reunion with RPF's promptness

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोटच्या चिमुकल्याला कोचमध्ये ठेवून आई फलाटावरच्या नळावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी आली. बाटली भरेपर्यंत गाडी सुटली अन् चिमकल्याची त्याच्या आईसोबत ताटातूट झाली. तो तिकडे आणि ही ईकडे, दोघेही कावरेबावरे होऊन रडू लागले. त्यांची अवस्था बघून रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) अॅक्शन मोडवर आले अन् तासा-दोन तासातच चिमुकला आईच्या कुशित पोहचला. दोन दिवसांपूर्वी कळमना रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना आज उघड करण्यात आली.

अहमदाबाद सुपरफास्ट ट्रेनच्या जनरल कोचमध्ये बसून निरूपमा (नाव काल्पनिक) ही महिला नागपूर येथे येण्यासाठी निघाली होती. तीन वर्षीय चिमुकला तिच्या सोबत होता. दुपारी २.२५ वाजता गाडी कळमना रेल्वे स्थानकावर थांबली. महिलेने चिमुकल्याला सहप्रवाशांच्या हवाली करून पाण्याची बाटली भरण्यासाठी फलाटावरच्या नळाकडे धाव घेतली. ती बाटलीत पिण्याचे पाणी भरत असतानाच गाडी सुटली. त्यामुळे तिने फलाटावर तर तिकडे कोचमध्ये तिच्या चिमुकल्याने आकांत सुरू केला. फलाटावरच्या आरपीएफच्या जवानांच्या लक्षात झालेला प्रकार येताच त्यांनी लगेच नागपूर कंट्रोलला कॉल दिला. त्यानुसार, गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचताच चिमुकल्याचा शोध घेऊन आरपीएफच्या जवानांनी त्याला आरपीएफच्या चाैकीत आणले. चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना बोलवून घेण्यात आले. आई दुरावल्याची जाणीव झाल्याने चिमुकला आक्रोश करीत होता. हरसंभव प्रयत्न करूनही तो शांत होत नव्हता. दरम्यान, त्याच्या आईलाही चिमुकला सुखरूप असल्याचा फोनवरून निरोप देऊन आरपीएफ चाैकीत येण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, चिमुकल्याची आई आणि आजोबा तेथे पोहचले. आईला बघताच चिमुकला तिला बिलगला. काळजाचा तुकडा दूर झाल्यामुळे तास-दोन तासांपासून माऊलीही अस्वस्थ होती. तो कुशित येताच तिने त्याच्यावर मायेचा वर्षाव करतानाच अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली.

महिनाभरात दुसरी घटना
गेल्या १९ मे रोजी अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली होती. कर्मभूमी एक्सप्रेसमध्येही आपल्या दोन मुलांना घेऊन नागपूरकडे एक महिला येत होती. गोंदिया स्थानकावर पिण्याचे पाणी घेताना गाडी सुटली. ती फलाटावर तर तिचे राम आणि शाम ट्रेनमध्ये राहून गेले होते. त्यावेळीदेखिल आरपीएफने तत्परता दाखवत तिच्या मुलांना नागपूर स्थानकावर उतरवून घेतले आणि नंतर आईच्या हवाली केले होते.

 

Web Title: Heart-touching incident at Kalamana station : Mother-son reunion with RPF's promptness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.