नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित नायलॉन मांजावरील प्रकरणावर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. नायलॉन मांजावर कायमची बंदी आणणे शक्य आहे किंवा नाही यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने शासनास दिले आहेत. शासनाच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मकरसंक्रांती काळात नायलॉन मांजा जप्त करण्याच्या कारवाईविरुद्ध रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने याचिका दाखल केली आहे. मकरसंक्रांती काळात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा व त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक कृत्रिम धागा वापरण्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. याशिवाय, मकरसंक्रांतीच्या काळात ठोक विक्रेत्यांना नायलॉन मांजाचा साठा व विक्री करता येत नाही. पर्यावरण विभागाने पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा किंवा त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक धागा वापरण्यास परवानगी देऊ नये. ठोक विक्रेत्यांना मकरसंक्रांतीच्या आधीच नायलॉन मांजाची विक्री करण्यापासून थांबविण्यात यावे इत्यादी सूचना अधिसूचनेत करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
नायलॉन मांजावर आज सुनावणी
By admin | Updated: July 18, 2016 02:44 IST