शाळेला बंक मारण्याच्या सवयीतून 'त्यानं' सोडलं घर, अन्...

By नरेश डोंगरे | Updated: December 13, 2024 23:06 IST2024-12-13T23:04:15+5:302024-12-13T23:06:50+5:30

मुंबई मार्गाच्या दिशेने (फलाट क्रमांक ८ वर) गाडीची वाट बघत असतानाच त्याचा मित्र तेथून सटकला.

He left home due to his habit of skipping school, and... | शाळेला बंक मारण्याच्या सवयीतून 'त्यानं' सोडलं घर, अन्...

शाळेला बंक मारण्याच्या सवयीतून 'त्यानं' सोडलं घर, अन्...

- नरेश डोंगरे

नागपूर : शाळेला बंक मारण्याची सवय जडलेल्या एका मुलाने थेट रेल्वे स्थानक गाठले. तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याची सैरभैर अवस्था ध्यानात येताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले अन् त्याचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सावरले. भानू (वय १४, नाव काल्पनिक) उपराजधानीतील एका वसाहतीत राहतो. 

घरची स्थिती सामान्य असून, आईवडील दोन्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत कामावर जात असल्याने तो घरी एकटाच राहायचा. ९ व्या वर्गात शिकणाऱ्या भानूला शाळेत जायचा कंटाळा येत असल्यामुळे दफ्तर घेऊन तो शाळेच्या वेळी घराबाहेर पडायचा आणि दिवसभर ईकडे तिकडे हुंडल्यानंतर सायंकाळी घरी जायचा. अलिकडे त्याला हेसुद्धा कंटाळवाणे वाटत असल्याने बुधवारी दिवसभर ईकडे तिकडे फिरल्यानंतर एका मित्रासह तो थेट रेल्वे स्थानकावर पोहचला. 

मुंबई मार्गाच्या दिशेने (फलाट क्रमांक ८ वर) गाडीची वाट बघत असतानाच त्याचा मित्र तेथून सटकला. त्यामुळे बाहेरगावी जावे की नाही, या अवस्थेत तो बराच वेळ बसून होता. त्याची ती अवस्था आरपीएफ कर्मचारी निर्मल चंदन यांनी हेरली. त्यांनी आरपीएफच्या अनुराधा मेश्राम यांना कळवून भानूला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केल्यानंतर त्याच्या आईवडीलांशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर चाईल्ड लाईनच्या रोशनी मेश्राम आणि सहकाऱ्यांना बोलवून भानूला त्यांच्या स्वाधीन केले.

आईवडील स्तंभित !
चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी भानूच्या आईवडिलांना बोलवून त्यांचे समुपदेशन केले आणि त्याला त्यांच्या स्वाधिन केले. एकुलता एक मुलाने घेतलेल्या या भूमीकेमुळे भानूचे आईवडील काही वेळेसाठी स्तंभित झाले होते. त्याचे भवितव्य अंधकारमय होता-होता बचावल्याने त्यांनी आरपीएफचे आभार मानले.

ऑपरेशन नन्हे फरिश्ते!
अशाच प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळे घर सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुला-मुलींना हेरण्यासाठी आरपीएफकडून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' राबविण्यात येते. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात आरपीएफने राज्यभरात अशा प्रकारे १०९९ मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले आहे.

Web Title: He left home due to his habit of skipping school, and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.